‘पांडुरंग’ कडून उसाला प्रति टन २ हजार ४२६ रुपये दर

शेतकऱ्यांना पोळा आनंदात

अकलूज (बारामती झटका)

श्रीपुर ता. माळशिरस, येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या हंगामातील उसाला प्रति टन १२६ रुपयांचा ऊस बिलाचा हप्ता जाहीर केला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिटन २४२६ रुपये ऊस दर अदा केले आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी दिली.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे, संचालक मंडळातील सदस्य, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार कारखान्याची वाटचाल सुरू आहे. गळीत हंगाम २०२१-२२ मधील उर्वरित एफआरपी ची रक्कम ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दीपावली सणाच्या अगोदर दिली जाईल, असे परिचारक यांनी नमूद केले.

यावेळी बोलताना कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले की, मागील हंगामाच्या वेळी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक दवाखान्यात ऍडमिट असतानाही त्यांनी फोन करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पोळा सणासाठी रक्कम देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यावेळी पोळा सणासाठी ऊस बिल अदा केले होते. त्यांच्याच आदर्शानुसार यावेळीही प्रशांत परिचारक यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना पोळा सणासाठी ऊस बिलापोटी रक्कम अदा करीत आहोत.

गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये कारखाना २०१ दिवस चालला होता. १२ लाख ५१ हजार मे. टन ऊस गाळप होऊन १४ लाख २५ हजार क्विंटल साखर होती उत्पादित केली होती. कारखान्याचा साखर उतारा ११.६५ टक्के राहिला असून हा साखर उतारा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा आहे. को जनरेशन प्लांटमधून ८.९२ कोटी युनिट वीज निर्माण करून राज्य विद्युत महामंडळाला ४.६८ कोटी युनिटची विक्री केली आहे.

कारखान्याच्या आसवाणी प्रकल्पामधून १ कोटी २८ लाख लिटरचे उत्पादन झाले आहे. आसवानी प्रकल्पामध्ये उत्पादित झालेल्या सर्व उत्पादनाची विक्री सर्वोच्च दराने चालू असून त्यामधूनही कारखान्याला उत्पन्न मिळत आहे. गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये कारखान्याने सर्वच क्षेत्रात उच्चांक केले आहेत. पुढील हंगाम २०२२-२३ मध्ये कारखान्याकडे सुमारे १४ हजार हेक्टरच्या ऊस नोंदी असून सुमारे १५ लाख मे. टन ऊस उपलब्ध होईल.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleबाळाला सहा महिन्यांपर्यंत आईचं दुधचं का पाजावं ?
Next articleसमाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here