उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयात 28 मंजूर पदे असताना 16 कर्मचारी यांच्यावर कामकाज सुरू असून त्यापैकी 7 शिपाई पदावर कार्यरत
माळशिरस ( बारामती झटका )
सदाशिवनगर ता. माळशिरस येथील श्रीमती पार्वतीबाई लक्ष्मण भोसले यांना गट नंबर 217 मधील क्षेत्र 22 हेक्टर 43 आर संपूर्ण गटाची मोजणी करून देण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी दि.22/02/2022 रोजी पत्र देऊन कळविलेले आहे. मात्र, भूमी अभिलेख कार्यालयात अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या व मोजणीसाठी आलेले अर्ज यामुळे विलंब लागलेला आहे. दि. 15/05/2022 तारखेच्या आसपास सदर गटाची मोजणी केली,असे भुमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षक पी. एस. पाटील मॅडम यांनी सांगितले.
प्रांताधिकारी कार्यालयाकडून भुमिअभिलेख कार्यालयाला पत्र येऊन सुद्धा श्रीमती पार्वतीबाई भोसले यांच्या गटाची मोजणी करण्यास विलंब झालेला असल्याने श्रीमती पार्वतीबाई भोसले यांनी अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतलेला होता. सदरची बातमी बारामती झटका वेबपोर्टल वर प्रसिद्ध झाल्यानंतर भुमी अभिलेख कार्यालयाकडून विलंब का होत आहे, याची चौकशी करण्याकरता भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप अधीक्षक पी एस. पाटील मॅडम यांची कार्यालयात भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली.
भुमी अभिलेख कार्यालय माळशिरस येथे 28 पदे मंजूर आहेत, त्यापैकी 10 क्लार्क आणि 2 शिपाई अशी 12 पदे रिक्त आहेत. कार्यरत असणाऱ्या 16 पदांमध्ये उपअधीक्षक पी. एस. पाटील मॅडम मुख्यालय सहाय्यक उर्मिला पवार मॅडम यासह 7 शिपाई व उर्वरित कर्मचारी आहेत. अनेक दिवस अभिलेख पाल, दप्तर बंद प्रतीलीपीक अशी 12 पदे रिक्त आहेत. शिपाई सुद्धा साफ सफाई काम करून कागदोपत्री काम करण्याचे सहकार्य करीत आहेत. सद्या 600 प्रकरणे चलन भरून मोजणीसाठी प्रलंबित आहेत. दररोज 70 ते 80 प्रकरणे मोजणीसाठी अर्ज येत आहेत. महिन्यातून प्रलंबित असणारी शेती महामंडळाची प्रकरणे निकालात काढण्याचे काम सुरू आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मोजणीची कामे विलंबित होत आहेत. कर्मचारी यांच्या बदल्या झालेल्या आहेत, नवीन लोकांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. एक कर्मचारी हजर आहे, तर उर्वरित हजर झालेले नाहीत. त्यामुळे मोजणी करण्यासाठी विलंब होत आहे. श्रीमती पार्वतीबाई भोसले यांचे शेती महामंडळाचे जमिनीची मोजणी पंधरा तारखेच्या आसपास केली जाईल असे सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्याची गरज आहे. माळशिरस तालुक्यामध्ये खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग या महामार्गाचे विस्तारीकरण झालेले असल्याने भुमिअभिलेख कार्यालयावर ताण येत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामास विलंब होत आहे, त्यामुळे जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कामे व्यवस्थित आणि वेळेवर व्हावीत, अशी माळशिरस तालुक्यातील जनतेची मागणी आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng