कानपूर येथे शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे वार्षिक अधिवेशन संपन्न
पुणे (बारामती झटका)
दि. ४ व ५ ऑक्टोबर रोजी नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट, कानपूर येथे पार पडलेल्या शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या वार्षिक अधिवेशनामध्ये पुण्यातील मार्क लॅब्स प्रा. लि. चे संचालक डॉ. एस.एस. निंबाळकर यांना ‘इंडस्ट्री एक्सलन्स’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल या उपस्थित होत्या. ही संस्था भारतातील साखर उद्योगातील मार्गदर्शक शिखर संस्था असून साखर उद्योग वाढीसाठी व प्रगतीसाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.

डॉ. निंबाळकर हे सणसर येथील रहिवाशी असून त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात सुवर्णपदकासह पीएचडी प्राप्त केली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दहा वर्ष शास्त्रज्ञ म्हणून काम केल्यानंतर त्यांनी व डॉ. वसुधा केसकर यांनी १९९७ मध्ये मार्क लॅब्स प्रा. लि. ची स्थापना केली आहे. मार्क लॅब्स ही जागतिक पातळीवर साखर संशोधन करणारी प्रयोगशाळा असून येथे साखरेची गुणवत्ता तपासणे व सुधारणे यासाठी मार्गदर्शन केले जाते. या प्रयोगशाळेस कोकाकोला व पेप्सिको यांची आंतरराष्ट्रीय मान्यता असून जगातील सुमारे २५ देशातील साखरेचे नमूने येथे तपासणीसाठी येत असतात. मार्क लॅब्सने तयार केलेले सुक्रोस्कॅन हे साखरेचा रंग तपासणारे उपकरण ८ देशातील ३०० पेक्षा जास्त साखर कारखाने वापरतात. या उपकरणात मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे पारितोषिक मिळाले आहे. इकुम्स या जागतिक कमिशनवरही डॉ. निंबाळकर हे काम करत आहे. देशपातळीवर झालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
