पुन्हा लहानपणाची 26 जानेवारी शाळेच्या अंगणात उतरावी.

माळशिरस ( बारामती झटका )

भारताला स्वातंत्र्य मिळून प्रजासत्ताक दिनाची सुरुवात होऊन आज 26 जानेवारी 2022 रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. त्याबद्दल बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनलच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जग एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना अनेक अमुलाग्र बदल झाले. आधुनिक जगात पूर्वीचे लहानपणीच जीवन अनेक लोकांना आठवत आहे.

थंडी असली तरीही 26 जानेवारीची पहाट आमच्या लहानपणी दिवाळीची पहाट असायची… चुलीवरल्या गरम पाण्याची आंघोळ आणि शाळेची जूनी असली तरी तांब्याच्या इस्त्रीची कपडे… नव्या कपड्यांपेक्षा जास्त आनंद द्यायची. मुलांपेशा प्रजासत्ताक दिनाचा आनंद कुटुंबात जास्त होता.

सकाळी शाळेची भली मोठी घंटा खणखण वाजायची. देशभक्तीपर गीतांनी सगळं गाव भारुन जायची… थंडीच्या कडाक्यातही देशभक्तीचा उबदारपणा सगळ्या गावाला जाणवायचा…. जिल्हा परिषद मराठी मुलांची व मुलींची असलेली शाळा नव्या नवरीगत नटायची… आनंद, उत्साह, जोश पावसाळ्यातल्या नदीसारखा अखंड वाहत असायचा..!
“एक रुपया चांदीचा …देश आमचा गांधीचा….”, भारत माता कि जय…. या घोषणांनी गाव दणाणून जायचा…. प्रभात फेरी म्हणजे….आपलंच गाव ….पण ऐटीत …अभिमानाने पाहण्याचीच मौज…. घराजवळून प्रभात फेरी जायची. त्यावेळी घराच्या कोपऱ्यावर आई, आजी उभी राहून आपल्या पोरांना कौतुकाने बघायची…. नकळत आईच्या डोळ्यात पाणी तराळायचं…. सगळ्या गावाचा सहभाग असलेली ही फेरी खरंच न्यारी असायची.
शाळेच्या ग्राउंडवर कवायत रंगात यायची… मग जोरदार आवाज यायचा… ‘सावधान’ आणि तिरंगा फडकायचा…… झेंड्याला सलामी देताना इवलूशी छाती देशभिमानानी भरुन यायची.

गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तालमींचा निकालाची वेळ आता येउन ठेपते. बोबड्या बोलीपासून सुरु झालेला कार्यक्रम रंगत जातो…कौतूकाच्या…. बक्षीसांची पाठीवर थाप मिळायची.. गुरुजी खूश….!
अध्यक्ष महाशय….गुरुजन वर्ग… आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगणिंनो….. अशी सुरुवात करुन सुरु झालेली भाषणे मग तासभर चालायची. अशा प्रकारे सर्व कार्यक्रमांची रेलचेल असायची. शेवटचा गोड कार्यक्रम बिस्किट वाटपाचा असायचा…. पारले चॉकलेट, बिस्किट म्हणजे जीव की प्राण…. असायचा……!

२६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे.. पण लहानपणी तो आमचा आनंद सोहळा असायचा……. दिवाळी प्रमाणे…. तो साजरा केला जायचा….. देशभक्तीचा असा सोहळा आता लोप पावत चाललाय…. कोवळ्या मनावर देशभक्ती रुजण्यासाठी आनंददाई वातावरण निर्मीतीसाठी ….पुन्हा लहानपणीची २६ जानेवारी शाळेच्या अंगणात उतरावी.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमांडवे येथील रत्नत्रय इंग्लिश स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Next articleमाळशिरस तालुक्यातील खताचा काळाबाजार बंद करून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांना चाप बसणार – अजितभैया बोरकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here