भव्य बैलगाडी शर्यत, जंगी कुस्त्यांचे मैदान, महानैवेद्य, छबीना विविध कार्यक्रमाने संपन्न.
सदाशिवनगर ( बारामती झटका )
पुरंदावडे ता. माळशिरस येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडली. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलेले होते. कोरोना संसर्ग पसरू नये यासाठी शासनाने नियम व अटी घालून दिलेल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील जत्रा, यात्रा, सण-उत्सव यावर बंदी घातलेली होती. सध्या कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव संपलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जत्रा-यात्रा लोक आनंदाने साजरे करीत आहेत. पुरंदावडे गावातील श्री महालक्ष्मी यात्रेसाठी राजकीय गट तट बाजूला सारून एका घोंगडीवर येऊन सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन उत्साही व भक्तिमय वातावरणामध्ये तीन दिवस ही यात्रा सुरू होती.

यात्रेची सुरुवात भव्य बैलगाडी शर्यत गुरुवार दि. 21/04/2022 रोजी करण्यात आली. बैलगाडी शर्यतीवरील बंदी न्यायालयाने उठवल्यानंतर ग्रामीण भागात बैलगाडी चालक-मालक व हौशी लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले होते. श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले होते. बैलगाडी शर्यतीसाठी अनेक गाडी मालकांनी सहभाग नोंदविला होता. बैलगाडी शर्यतीत कायदा व सुविधा अबाधित रहावी, अनुचित प्रकार घडू नये, यासाठी माळशिरस पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांनीसुद्धा बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी भेट दिलेली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.

शुक्रवार दि. 22/04/2022 रोजी महानैवेद्य व देवीचा छबिना मिरवणूक असते. या दिवशी पूरंदावडेकर मित्रपरिवार व नातेवाईक यांना मनपसंत भोजनाचा आस्वाद दिला जातो. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये देवीच्या छबिन्याची मिरवणूक ढोल-ताशाच्या गजरामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये कार्यक्रम होत असतो. शनिवार दि. 23/04/2022 रोजी भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान घेतलेले होते. सदर कुस्ती मैदानाचे उद्घाटन अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मदनदादांच्या शुभ हस्ते कुस्ती लावण्यात आलेली होती. यावेळी मदनदादांचा सन्मान ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्यावतीने सरपंच देविदास ढोपे यांनी केलेला होता.

सदरच्या कुस्ती मैदानात माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सावता परिषदेचे संस्थापक कल्याणराव आखाडे, नातेपुते नगरपंचायतचे नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने, मेडदचे माजी सरपंच युवराजतात्या झंजे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब माने, लोणंदचे माजी सरपंच भीमराव होळ, युवा नेते राजू पाटील, मेडदचे उपसरपंच शिवाजीभाऊ लवटे, एन आय कुस्ती कोच वस्ताद महादेव ठवरे, वस्ताद बापुराव कोळेकर, भाऊसाहेब भोंगळे यांच्यासह वस्ताद मल्ल, कुस्ती शौकीन ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुस्तीचे समालोचन वस्ताद हनुमंतराव शेंडगे यांनी केलेले होते. श्री महालक्ष्मी यात्रेचे नेटके नियोजन महालक्ष्मी यात्रा कमिटी व पुरंदावडे गावचे कर्तव्यदक्ष सरपंच देविदास ढेपे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व कार्यकर्ते व नेतेमंडळी यांनी केले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng