पुरंदावडे सदाशिवनगर ग्रामस्थांची कॉलमच्या उड्डाणपुलासाठी ‘पाऊले चालती बारामतीची वाट’, पवार परिवारांची भेट घेण्याची शक्यता

उड्डाणपूल प्लेट ऐवजी कॉलममध्ये करावा, सदाशिवनगर पुरंदावडे गावातील व्यापारी व जनतेची मागणी योग्य

माढा लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, विधानसभेचे आ. राम सातपुते या लोकप्रतिनिधींचा कानाडोळा

सदाशिवनगर ( बारामती झटका )

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग विस्तारीकरणात सदाशिवनगर पुरंदावडे या गावामध्ये उड्डाणपूल करण्याचे काम सुरू आहे. सदरच्या पुलाला ग्रामस्थांचा, व्यापारी अथवा स्थानिक नागरिक यांचा विरोध नाही, मात्र सदरचा उड्डाणपूल प्लेट ऐवजी कॉलममध्ये तयार करावा, अशी मागणी केली जात आहे. भविष्यात दोन्ही गावाच्या अस्तित्वासाठी मागणी योग्य आहे, यासाठी माढा लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आ‌. रणजीतसिंह मोहिते पाटील, विधानसभेचे आ. राम सातपुते या तिन्ही लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची सदाशिवनगर व पुरंदवडे जनतेची अपेक्षा होती.

मात्र, लोकप्रतिनिधींचा कानाडोळा दिसत असल्याने पुरंदावडे व सदाशिवनगर ग्रामस्थांची ‘पाऊले चालती बारामतीची वाट’ देशाचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब, विद्यमान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, कर्जत जामखेडचे युवा आ. रोहितदादा पवार यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी दोन दिवसात पुरंदावडे व सदाशिवनगर गावातील ग्रामस्थ भेटण्याकरता जाणार असल्याची दबक्या आवाजात कुजबुज सुरु झाली आहे.

सदाशिवनगर पुरंदावडे दोन्ही ग्रामपंचायतींनी व उड्डाणपूल संघर्ष समिती स्थापन करून सर्वांनी मिळून जिल्हाधिकारी, प्रकल्प संचालक, प्रांताधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन दि. 23/07/2022 रोजी समस्त ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेत्यांचा रास्ता रोको आहे. जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, पनवेल यांना निवेदन देऊन प्लेटच्या उड्डाणपूलाचे काम बंद पाडले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन दोन्ही गावाची वस्तुस्थिती व स्थानिक व्यापारी, नागरिक, शालेय विद्यार्थी यांच्या अडचणी सांगितल्यानंतर निश्चितपणे मार्ग निघेल. कारण, देशात व राज्यात भाजपचे सरकार आहे. योगायोगाने तिन्ही लोकप्रतिनिधी भाजपचे आहेत. त्यामुळे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात संयुक्त बैठक केल्यास निश्चितपणे मार्ग निघेल अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र, लोकप्रतिनिधींचा काना डोळा दिसत असल्याने ‘पाऊले चालती बारामतीची वाट’, अशी कुजबूज सुरू झाली आहे.

दोन्ही गावातील स्थानिक नागरिक, व्यापारी, शेतकऱ्यांची मागणी योग्य आहे. पालखी महामार्गासाठी विरोध नाही किंवा उड्डाणपुलाला सुद्धा विरोध नाही. फक्त रचना बदलावी एवढाच प्रश्न आहे. प्लेटच्या उड्डाणपूलाचे काम थोडे झालेले आहे. त्यामुळे सदरचा उड्डाणपूल रद्द करून कॉलमचा उड्डाणपूल तयार व्हावा, ही अपेक्षा आहे. तसे नाही झाल्यास भविष्यातील पुढील सर्व पिढ्यांचे भवितव्य अंधारात राहणार आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला असून भविष्यातील पिढ्यांसाठी लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या गावातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थ निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत, अशी कुजबूज सुरू झाली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशिंदे-फडणवीस सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक दणका
Next articleविझोरी येथे चि. सचिन राचकर आणि चि.सौ.कां. स्वप्नाली काळे यांच्या जुळणार रेशीमगाठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here