सातारा (बारामती झटका)
सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. सुभाष वाघमारे यांनी अतिशय सुंदर अशी प्रतीकात्मक कविता लिहिली आहे.
दबा धरून बसलेले सुंदर गावपक्षी ……[कविता ]
गावाने घातलेले गळ्यातले हार तुरे, आता सुकत चाललेले ……
अशातच गावात नवे स्वतंत्र निळेशार पक्षी उडत उडत आले
हे पाहून दबा धरून बसलेले ते सुंदर गावपक्षी
चोचीने आपल्याच गळ्यातल्या जुन्या हारावर, टोच्या मारत हसले ..
दोन चार फेऱ्या गावातल्या आकाशावर मारून ते मनाशीच म्हणाले ….
‘आहे, आहे अजून तरी आपलंच गाव !’
कडुनिंबाच्या झाडावर बसून नव्या स्वतंत्र पक्षावर ते किंचाळले,
“कुठले रे तुम्ही ?.. या गावात कसे आलात ? तुम्ही पाहुणे आहात, नीट रहा”.
स्वतंत्र पक्षी म्हणाले, ’आम्हाला गाव नाही, हे सारे विश्व आहे‘
नदी, जंगले, डोंगर, पर्वत, हे सारे आकाश तर आमचे आहे ‘
मुक्तपणे जीवन जगायचा अधिकार निसर्गानेच दिला आम्हाला !
‘’ असेल, असेल! या गावात आले की नीट रहायचं ! हमारे साथ पंगा लेने का नै ! ’’
दोन दिवस स्वतंत्र पक्षी गावात फिरले …त्यांची शीळ स्वातंत्र्याची !समतेच्या आकाशात सर्वांनी फिरावे अशी..
कुजबुजत का होईना गावातले इतर पक्षी स्वतंत्र पक्षाची शीळ शिकू लागले
तेंव्हा मात्र पडक्या वाड्यावर गावपक्षी तळमळत पाहू लागले ..
दात खात मनाशी म्हणाले….’’अशी अनेक पाखरे आमच्या याच चोचीने मारलीत !
आमच्या पिढीजात चोचीचे लाल रक्त अजून नीटसे स्वतंत्र पक्षांनी बघितलेले नाही !
‘हा ! आता लोकांना घुलवायला शीळ मारतात ..वेडे कुठले -इथे सूर्य देखील आम्हाला घाबरतो.
ठीक आहे ! स्वतंत्र पक्षी जास्त नखरे करू लागले तर स्वतंत्र पक्षाच्या डोक्यावर
बसून त्यांच्या डोक्यात चोच खुपसून गुदगुल्या करू – गुदगुल्या करून ठार मारू –मात्र डोक्यावर बसूच!..
काही गावातले पक्षी मिळालेच तर कळप करून ठार मारून इर्जिक करू —या पक्षांचे मटन खाऊ!
स्वतंत्र पक्षाच्या गळ्यावर इतक्या चोची मारू की त्यांचा गळाच राहणार नाही ,
मग वाजवाल का स्वातंत्र्याची शीळ ?
गाव वेशीच्या उंच टोकावर बसून ,घारोळ्या डोळ्याने .. दबा धरून चिंतन करीत बसलेले ते सुंदर गावपक्षी !
अन समतेच्या आकाशात सर्वांनी मुक्त फिरा म्हणणारे ते निरागस स्वतंत्र पक्षी !
प्रोफेसर डॉ.सुभाष वाघमारे
मराठी विभाग प्रमुख
छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा
९८९०७२६४ ४०
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng