सातारा (बारामती झटका)
सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. सुभाष वाघमारे यांनी सध्याच्या परीस्थितीवर कविता लिहिली आहे. हल्ली चळवळ, संप, आंदोलने सर्रास चालू आहेत. पण ही चळवळ नेमकी कशासाठी आणि कोणासारखी पाहिजे, हे या कवितेच्या माध्यमातून प्रो. डॉ. वाघमारे यांनी सांगितले आहे.
पुन्हा चळवळ सुरु होईल… [कविता ]
बुद्धाने चालवली चळवळ माणुसकीसाठी,
दुःखातून मुक्त करण्यासाठी, सर्वांच्या सुखासाठी,
बहुजन हिताय, बहुजन सुखाय !
संतानी चालवली चळवळ, सदाचारासाठी,
शिवरायांनी केली चळवळ, अन्याय, अत्याचार, जुलुमाला करीत विरोध
रयत सुखी रहावी म्हणून !
जोतीरावांनी कळवळ्याने दिले शिक्षण
पाजले आडाचे पाणी, आपलीच माणसे समजून —
तलवारी घेऊन आले मारेकरी, तरी थांबली नाही चळवळ !
गरिबांची, उपेक्षितांची, शेतकऱ्यांची,
कितीतरी वंचितांच्या न्यायासाठी चालवली चळवळ
शिक्षण, अंधश्रद्धा, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह, स्त्रियांना न्याय,
केशवपन, सावकारशाही विरोध, स्वच्छता, कष्ट, व्यसन विरोध, ग्रंथवाचनासाठी, शेतकऱ्यांचा न्याय …
सावित्रीची साथ त्यांना चांगल्या परिवर्तनासाठी…..
शाहू महाराजांनी चालवली चळवळ अस्पृश्य, भटक्या विमुक्तासाठी,
शिक्षण देण्यासाठी, शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी
खोटे देव गाडण्यासाठी, माणसाला माणूस बनवण्यासाठी,
कर्मवीरांनी केली चळवळ ग्रामीण माणसाच्या न्यायासाठी, शिक्षणासाठी
स्वावलंबी जीवन जगण्यासाठी, रयतेची सेवा करण्यासाठी ….
बाबासाहेबांनी केली चळवळ माणुसकीचे हक्क मिळविण्यासाठी,
सामाजिक न्यायासाठी, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा भारत उभा करण्यासाठी
गाडगेबाबांनी केली चळवळ रोकड्या धर्मासाठी ….
अशा आजही दिसतात खऱ्या, पोटापाण्यासाठी !
तुटत चाललेली नाती, घराणेशाहीत बुडलेलं गाव, बेकारीने
मरणाच्या यातना भोगणारी नवे सुशिक्षित बेकार,
विषमतेने खच्ची झालेले मजूर, कामगार —
नोकरशाही, राजकारणी, भांडवलदार यांचा भ्रष्टाचार
अंधश्रद्धेत गुंडाळलेले गाव, अन हाडकात विकली जाणारी मते,
अशा कितीक प्रश्नासाठी आता तीव्रतेने होत नाही कुठे चळवळ ?
पोटार्थी गावाला दिशा देणारे नवे जोतीराव हवेत,
अन्यायाविरुद्ध लढणारे न्यायी आंबेडकर हवेत,
गरीबाला आधार देणारे शाहूराजे पुन्हा हवेत,
सर्वांच्या शिक्षणाची काळजी घेणारे कर्मवीर हवेत,
भेदभाव न करता सगळ्या गावाची काळजी करणारे नेते हवेत,
प्रश्न संपले नाहीत तरी, चळवळ होत नाही,
पिऊन पडलेले मुडदे करतील का न्यायासाठी चळवळ ?
सारेच कसे गुमसुम गुमसुम –
कळते तेच विकले जातील, तर चळवळ होईल ?
वाट पाहतो आहे…. पुन्हा चळवळ सुरु होईल !
सर्वांच्या कल्याणासाठी !
प्रोफेसर डॉ.सुभाष वाघमारे
मराठी विभाग प्रमुख
छत्रपती शिवाजी कॉलेज
सातारा
९८९०७२६४४०
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng