सातारा (बारामती झटका)
सातारा छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. सुभाष वाघमारे अतिशय सुंदर अशी कविता लिहून त्यांनी सामाजिक संदेश दिला आहे. या कवितेतून त्यांनी माणसाला स्वतःची ओळख करून दिली आहे.
संविधानाचा प्रकाश तू —— [कविता ]
आता ना ब्राह्मण तू, आता ना क्षत्रिय तू
आता ना वैश्य तू, आता ना शुद्र तू
आता ना रुद्र तू, आता ना अतिशूद्र तू
आता ना स्त्री तू, आता ना पुरुष तू
आता फक्त माणूस तू, अन संविधानाचा प्रकाश तू !
आता ना काळा तू, आता ना गोरा तू
आता ना राम तू, आता ना कृष्ण तू
आता ना देव तू, आता ना दानव तू
माणुसकीने वागणारा, अरे माणूस तू
आता समतेचे आकाश तू, संविधांनाचा प्रकाश तू !
आता ना उच्च तू, जातीचा गुच्छ न तू
अंधश्रद्धेचे गाव न तू, दांभिकतेची नाव न तू
आता ना राजा तू, आता ना राणी तू
स्वातंत्र्य तुझे हक्काचे, आता ना गुलाम तू
बंधुतेची आस तू, संविधानाचा प्रकाश तू !
ना हिंसक हिटलर तू, ना अहंकारी सद्दाम तू
ना लादेन तू, ना सनातन उद्दाम तू
कायद्याचे पाय तू, सामाजिक न्याय तू
देशासाठी जगणारी, लोकांची माय तू
खरा भारतीय तूच तू, संविधानाचा प्रकाश तू !
त्यागातून स्वातंत्र्य ज्यांनी आणले देशात या
त्या हुतात्म्यांचा वारस खरा आहेस तू
धर्मांधता जाळणारा, एक नवा नायक तू
देशाचे ऐक्य गाणारा, उमदा गायक तू
देशोन्नतीची आस तू, संविधानाचा प्रकाश तू !
धर्म, जात, वंश, लिंग, भेद इथले घालवणार तू
ना हिंदू, ना मुस्लीम, ना शीख, ना इसाई तू
भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व हे आमचे तत्वज्ञान तू
एकात्म देशाचे माझ्या अवधान गड्या तू
सत्यमेव जयतेचा ध्यास तू, हितकारी संविधानाचा प्रकाश तू !
विषमय जुन्या जीर्ण रुढींचा नकार तू,
घराणेशाही घालवणारा नवा होकार तू
धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा सैनिक निष्ठावंत तू
दमनकारी कुत्र्यांचा करणार नक्कीच अंत तू
पिचलेल्या जीवांचा घास तू ! संविधानाचा प्रकाश तू !
घे सर्वांचे हात हातात तू ! अन गा नवे समतेचे गीत तू
नको विध्वंस चांगल्याचा, कार्य हिताचे करणार गे तू
फुले विविध रंगांची, उद्यान आनंदमयी करणार तू
काळीज काळीज गुंफणारा प्रेमाचा दोर तू
निर्मळ निर्झर होण्याचा ध्यास तू, संविधानाचा प्रकाश तू !
प्रोफेसर डॉ.सुभाष वाघमारे
मराठी विभाग प्रमुख
छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा
९८९०७२६४४०
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng