फलटण (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाच्या जनजागृती अभियानांतर्गत स्वराज फाउंडेशन व सांसा फाउंडेशनच्या वतीने प्रथमच केंद्रीय मंत्रालयातील विविध विभागांचे शायनिंग महाराष्ट्र २०२२ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन दि. २५, २६, २७ मार्च २०२२ रोजी स. १० ते सायं. ०५ वाजेपर्यंत शुभारंभ लॉन्स, विंचुर्णी रोड, फलटण येथे करण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये संपूर्ण भारतातून केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध विभागाचे कॅबिनेट मंत्री, नेते, उद्योगपती, अधिकारीवर्ग, संशोधक, डॉक्टर्स, इंजिनीयर, वकील व इतर प्रतिष्ठित मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती असणार आहे. या प्रदर्शनामध्ये मंत्रालयातील सर्व सहभागी विभागाकडून लाईव्ह प्रात्यक्षिके दाखवण्यात येतील. (विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी विभाग, संरक्षण विभाग, अंतराळ विभाग, अक्षय ऊर्जा विभाग व इतर सर्व विभाग) केंद्रीय मंत्रालयातील १०० हून अधिक विभागाचा या प्रदर्शनामध्ये सहभाग असेल.
खादी आणि ग्रामोद्योग विकास अंतर्गत खादी, दोर, ताग, पर्यावरणस्नेही (इको फ्रेंडली) हातमाग आणि ग्रामीण कारागिरांची हस्तकला यांचाही या प्रदर्शनामध्ये सहभाग असणार आहे. त्याचबरोबर या प्रदर्शनात सहभागी सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तर स्पर्धा (Quize Compitation) आयोजित केली जाणार असून विजयी व सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक भेट वस्तू व चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शाळेचे विद्यार्थी घेऊन येणाऱ्या सर्व शाळा प्रमुखांचा, शिक्षकांचा विशेष भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व गोरगरीब जनता, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिलावर्ग व ज्येष्ठ मंडळी यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती या प्रदर्शनामध्ये प्राप्त होणार आहे. तरी केंद्र शासनाच्या जनजागृती अभियानांतर्गत विविध योजनांची माहिती मिळवण्यासाठी शायनिंग महाराष्ट्र २०२२ च्या भव्य प्रदर्शन ला आवश्य भेट द्यावी व लाभ घ्यावा. संशोधन, शेती, उद्योग, व्यवसाय, सेवा अशा अनेक क्षेत्रातील माहिती मिळवण्यासाठी आवर्जून प्रदर्शनास भेट द्या असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng