बारामती तालुका पोलीस स्टेशनची आणखी एक धडाकेबाज कामगिरी…

बारामतीमध्ये दोन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोने हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांना केले जेरबंद

बारामती (बारामती झटका)

बारामती तालुका पोलीस ठाणे हददीतील सूर्यनगरी व संदीप कॉर्नर रूई परिसरातून महिलांच्या गळ्यातील सोने हिसकावून नेण्याचे प्रकार घडले. त्यावरून बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गु. रजि. नं. 428 /22 व गु. रजि. नं. 462 /22 भादवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हे दाखल होते. सदरचे चोर मोटार सायकलवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोने हिसकावून घेऊन पळून जात होते. पोलीस निरीक्षक श्री. महेश ढवाण यांनी गुन्हे शोध पथकास सदर मोटरसायकलचा व चोरट्यांचा शोध घेण्यास सक्त सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राम कानगुडे, पो. नाईक अमोल नरूटे, पो. कॉ. दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, दिपक दराडे यांनी सदरचे आरोपी यांना रंगेहात पकडण्यासाठी एमआयडीसी, सूर्यनगरी, तांबे नगर, रुई या भागात पोलीस निरीक्षक श्री. महेश ढवाण यांच्या आदेशाने पेट्रोलिंगचे प्रमाण वाढवले होते. तसेच बारामती शहर व परिसरातील अनेक सीसीटिव्ही कॅमे-याचे फुटेज तपासणी, तांत्रिक माहिती व संशयीत इसम यांची तपासणी पथक करीत होते.

दि. 22/8/22 रोजी सूर्यनगरी भागात गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पेट्रोलिंग करत असताना दोन संशयित इसम यामाहा एस झेड या गाडीवरून जोरदार वेगाने जात असताना आढळून आले. ते साध्या वेशातील पोलीस अंमलदार यांना ओळखून घाबरून जोरात स्पीडमध्ये गाडीवरून पळून जात असताना मोटर सायकल स्लीप झाल्यामुळे रस्त्यावर पडले. त्यामध्ये पाठीमागे बसलेला इसम हा जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडला व मोटर सायकल चालवणारा आपल्या साथीदाराला अपघातामध्ये मार लागलेला असताना देखील त्याला मदत न करता गाडी घेऊन पळून गेला. सदर जखमी आरोपीस गुन्हे शोध पथकातील पोलिसांनी तत्परता दाखवून आपल्या पोलीस वाहनातून महिला हॉस्पिटल या ठिकाणी त्याला तात्काळ घेऊन गेले. त्यामुळे त्याच्यावरती लगेच डॉक्टरांनी उपचार सुरू केले. त्यानंतर मोठ्या शितापीने मोटर सायकल घेऊन पळून गेलेला आरोपी यास शोधून काढले. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता “सूर्यनगरी येथून महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण हीस्काऊन घेऊन पळून जात असताना पोलीस पेट्रोलिंग करीत असल्याचे आम्हाला दिसले म्हणून गाडी आणखी जोरात पळून घेऊन चाललो असता गाडी स्लीप होऊन आम्ही पडलो”. अशी त्याने कबुली दिली.

त्यांची नावे – 1 . मयूर राजेंद्र गटकुळ व २. राहुल अशोक चव्हाण दोघे रा. शिरसोडी ता. इंदापूर, जि. पुणे अशी आहेत. यातील मयूर राजेंद्र गटकुळ हा आरोपी सध्या बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस कस्टडीमध्ये आहे. तसेच राहुल अशोक चव्हाण हा आरोपी पळून जात असताना अपघातामध्ये जखमी झाल्याने सध्या त्याच्यावरती ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचार चालू आहेत.

या दोन्ही चोरट्यांनी बारामती येथील सूर्यनगरी व संदीप कॉर्नर या ठिकाणावरून महिलांच्या गळ्यातील सोने हिसकावून जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत. दोन्ही गुन्हयातील मिळून एकूण 1,75,000/- रकमेचे सोने गळ्यातून हिसकावून ओढून नेऊन जबरी चोरी करून नेले होते. ते सर्व सोने मयूर राजेंद्र गटकुळ याचेकडून जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राहुल घुगे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. कोलते हे करीत आहेत. याप्रमाणेच त्यांनी आणखी गुन्हे केले असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. त्यामुळे आणखीण बारकाईने बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक तपास करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. महेश ढवाण, पो. हवा. राम कानगुडे, पो.नाईक अमोल नरूटे, पो. कॉ. दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, दिपक दराडे यांनी केलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleउपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली.
Next articleसंभाजी ब्रिगेड ने वरूण सरदेसाई यांचे केले स्वागत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here