महेश केंगार यास एम.बी.बी.एस. शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होण्यास सहकार्य करणार – आमदार राम सातपुते.
माळशिरस ( बारामती झटका )
प्रतिकूल परिस्थितीत महेश केंगार यांने नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. एमबीबीएस डिग्री पूर्ण करून डॉक्टर होण्याकरता त्याला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी केंगार यांच्या सत्काराच्या प्रसंगी सांगितले. भांबुर्डी ता. माळशिरस येथील दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करणारे सौ. सुरेखा अंकुश केंगार व श्री. अंकुश जयवंत केंगार यांचा चिरंजीव महेश केंगार याने नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे सन्मान करण्यात आला. यावेळी वडील अंकुश केंगार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भांबुर्डी गावामधील शेतमजूर असणारे केंगार दांपत्य यांना दोन अपत्य महेश आणि पंकज. पंकज अकरावीमध्ये आहे तर महेश याने नीट परीक्षेत ९९.८५ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. महेश केंगार यांचे पहिली ते सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांबुर्डी येथे शिक्षण झालेले आहे. आठवी ते दहावी रणजितसिंह मोहिते पाटील विद्यालय जाधववाडी व अकरावी ते बारावी विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज जाधववाडी येथे शिक्षण पूर्ण केलेले आहे. नीट परीक्षेची तयारी माळशिरस येथील अमोल चोरमले सर यांच्या कोहिनूर क्लासेसमध्ये केली. पहिल्याच परीक्षेमध्ये ९९.८५% गुण मिळवून तो एमबीबीएस कोर्ससाठी पात्र ठरलेला आहे.

आई वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करीत असताना त्यांनी आपल्या मुलांचे शिक्षण करण्यासाठी अहोरात्र कष्ट केलेले आहे. स्वतः अडाणी आहेत मात्र, आपली मुले सुशिक्षित हावीत यासाठी त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज महेश केंगार यांनी केलेले आहे. महेश यांच्या यशाबद्दल लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी महेशचे वडील आणि महेशला घडवणारे शिक्षक अमोल चोरमले उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng