भारतीय जनता पक्षाच्या कमळाकडे दोन रणजीतसिंह खासदार आणि आमदार लक्ष देणार का ?

महाळुंग नगरपंचायतीच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाच्या राजकीय दलदलीत भाजपच्या कमळाचा उदय झाला.

महाळुंग ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील माढा विधानसभा मतदार संघातील महाळूंग नगरपंचायतची निवडणूक सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते फत्तेसिंह माने पाटील व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या ही प्रचाराचा शुभारंभ झाला. मात्र जिल्हा व तालुका स्तरावरील नेतेमंडळी उपस्थित नसल्याने भारतीय जनता पक्षाच्या कमळाकडे माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे दोन रणजीतसिंह लक्ष देणार का ? असा महाळुंगच्या भाजपच्या मतदारांना प्रश्न पडलेला आहे. कारण महाळुंग नगरपंचायतीच्या निवडणुकीत मोहिते-पाटील यांच्या तीन गटाच्या राजकीय दलदलीत भाजपच्या कमळाचा उदय झालेला आहे. महाळुंग नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवीत असल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आलेले आहे.

महाळुंग नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपने माढा लोकसभा मतदार संघाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांना निरीक्षक नेमले होते. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पदाधिकारी व इच्छुक उमेदवार यांची बैठक घेतली होती. मोहिते पाटील यांचे तीन ते चार गट असल्याने एकमत होऊ शकत नव्हते. त्यामुळे पुणे येथील महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या बैठकीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीविषयी आढावा दिलेला होता. स्थानिक आघाड्या करून निवडणुका लढविण्याचा मोहिते-पाटील गटाचा कल होता. भाजपच्या ध्येय धोरणानुसार वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा सूर निघाल्यानंतर वरिष्ठांनी भारतीय जनता पार्टीचे एबी फॉर्म संबंधित भाजपकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडे सुपूर्त करण्यात आले. एबी फॉर्म जोडल्यानंतर मोहिते-पाटील गटांची पंचायत झाली आणि माळशिरस तालुक्यात राजकीय खळबळ माजली. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भाजपचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी भाजपमध्ये गटबाजी केली, अशी अवई मोहिते पाटील गटाकडून देण्यात आली. मात्र मोहिते पाटील समर्थकांना भाजपच्या ध्येयधोरणांची कल्पना नसावी. भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचे निर्णय वरिष्ठ पातळीवरून होत असतात, जेणेकरून भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे आणि कमळ चिन्ह तळागाळात पोचली पाहिजे, यासाठी भाजपचे वरिष्ठ नेतृत्व प्रयत्न करीत असतात. त्याच धर्तीवर नगरपंचायत निवडणुकीत भाजपने सर्व जागांवर उमेदवार दिलेली आहेत. नगरपंचायत निवडणुकीच्या धर्तीवर बुथ प्रमुख शक्ती केंद्रे स्थापन केलेली असतात. प्रत्येक बूथमध्ये युवकांची फळी निर्माण केलेली असते असे सर्व असताना भाजपच्या उमेदवारांचा शुभारंभ करण्याकरता प्रदेश जिल्हा व तालुका स्तरावरील भाजपच्या नेत्यांनी पाठ फिरवलेली असल्याने भाजपच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी एका स्टेजवर येऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार करतील का ? असा भाजपच्या गोटामध्ये सवाल उपस्थित केला जात आहे. भारतीय जनता पार्टीचे लोक प्रतिनिधी पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याकरता जबाबदारी घेतील का ? याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे तुकाराम देशमुख व भाजपचे विजय देशमुख यांची लक्षवेधी लढत.
Next articleमाळशिरस नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ धुमधडाक्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here