मनसेचे तालुका उपाध्यक्ष प्रदीप ननवरे यांचे पुरवठा अधिकारी यांना निवेदन

गोदामातील धान्य हे ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भरून महसूल विभागातील संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने वाहतूक करीत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष प्रदीप ननवरे यांनी सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब यांना तालुक्यातील गोदामातील धान्य हे ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त भरून महसूल विभागातील संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने वाहतूक करीत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील शासकीय गोदाम मालवाहतूक ठेकेदार, रेशन दुकानदार, पुरवठा विभाग, गोदाम विभाग, पुरवठा विभागातील तहसील कर्मचारी यांच्या संगनमताने गोदामातील धान्य हे ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड भरून वाहतूक केली जात आहे. याबाबत माळशिरस तालुक्याचे तहसीलदार यांना दि. १४/११/२०२२ रोजी संबंधितांवर कार्यवाही करण्याबाबत पत्र दिले होते. परंतु, त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. उलट संबंधित कर्मचाऱ्यांना तहसीलदार साहेब पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे‌.

तसेच आम्ही व्हिडिओ बनवतेवेळेस सरकारी धान्य गोदामातील कर्मचारी, ड्रायव्हर, हमाल यांनी माहिती दिली की, आम्ही आरटीओ यांना हफ्ते देतो म्हणून आम्हाला ओव्हरलोड माल देण्यास परवानगी आहे. त्यामुळे याबाबत सुद्धा अकलूजचे आरटीओ साहेब यांना या प्रकरणाची चौकशी होऊन केलेल्या कार्यवाहीची प्रत आम्हाला मिळावी, अशी मागणी केली होती. परंतु, त्यांच्याकडून सुद्धा आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही व आम्हाला माहिती मिळाली नाही‌. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचारी हे आपल्या पदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर करत असल्याचे दिसून येत आहे.

तरी या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन गोदामातील शासकीय धान्य हे ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जादा भरून वाहतूक करीत आहेत, तसेच शासकीय धान्याचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे, या दोन्ही बाबींची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही व्हावी. तसेच शासकीय धान्य ज्या गोडाऊनमध्ये साठवण्यात येते व जेथे वितरित करण्यात येते, त्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईलने हलगीनाद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय, पुनम गेट समोर, सोलापूर येथे करण्यात येईल. असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी माळशिरस तालुका उपाध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा ननवरे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष म.वि.से. अमर कुलकर्णी, नातेपुते शहर प्रसिद्ध प्रमुख दादा भांड आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा – व्ही. व्ही. डोके
Next articleबागेचीवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here