प्राथमिक स्वरूपात २५ शेतकऱ्यांना डिजीटल सातबाराचे वाटप
मंडल अधिकारी ढाणे व गाव कामगार तलाठी शिंदे यांचे या योजनेचा लाभ घेण्याचे शेतकरी बांधवांना आवाहन
इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून
रेडा(ता. इंदापूर, जि. पुणे) येथे महसूल व वन विभाग डिजीटल स्वाक्षरीत गाव नमुना नंबर ७/१२ मोफत घरपोच वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ इंदापूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी मल्लाप्पा ढाणे व रेडा गावकामगार तलाठी औदुंबर शिंदे या अधिकाऱ्यांच्या उपस्थित दि. २ ऑक्टोंबर रोजी रेडा गावामध्ये करण्यात आला. प्राथमिक स्वरूपात २५ शेतकरी बांधवांना डिजीटल स्वाक्षरीत गाव नमुना नंबर ७/१२ वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम दिवसभर आजच्या दिवशी चालू राहणार आहे, असे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.
महसूल व वन विभाग डिजीटल स्वाक्षरीत गाव नमुना नंबर ७/१२ मोफत घरपोच वाटपाच्या कार्यक्रम शुभारंभ प्रसंगी मंडल अधिकारी मल्लाप्पा ढाणे बोलताना म्हणाले की, भारत देश महात्मा गांधी यांची जयंती ७५ वे वर्ष म्हणजे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत असून याचे औचित्य साधून महसूल व वन विभाग डिजीटल स्वाक्षरी गाव नमुना नंबर ७/१२ (सातबारा) मोफत घरपोच वाटप करत असुन या योजनेचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. तसेच ऑनलाईन पीक पाणी नोंदणीचा मोबाईल अॅपद्वारे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील पीक पाणी नोंद करून घेऊन याचाही लाभ घ्यावा, असे त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना संबोधित केले.
त्याचप्रमाणे रेडा गावचे गाव कामगार तलाठी औदुंबर शिंदे हे उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना म्हणाले, रेडा, रेडणी गावातील सर्व शेतकरी बांधवांना घरपोच डिजीटल स्वाक्षरीत ७/१२ (सातबारा) घरपोच केला जाईल. कोणीही या योजनेपासून वंचित राहणार नाही. आज २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती असून त्यानिमित्ताने सर्व उपस्थित शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतो. सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस उपस्थित सर्व ग्रामस्थ शेतकरी बांधवांनी विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
या कार्यक्रमासाठी रेडा गावच्या महिला सरपंच सुनीता देवकर, पोलीस पाटील ज्योतीताई भोसले, युवा नेते नानासाहेब देवकर, पोपट लक्ष्मण देवकर, ह.भ.प उंबराव देवकर, तुकाराम सोनटक्के, हनुमंत अंकुश देवकर, अमोल सकट, विक्रम देवकर त्याचप्रमाणे पत्रकार संतोष भोसले, कैलास पवार, शशिकांत सोनटक्के, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश वाघ व शेतकरी बांधव उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व या कार्यक्रमाचे सर्व नियोजन रेडा गावचे गाव कामगार तलाठी औदुंबर शिंदे, गणेशाराम जवंजाळ यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला. या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित असलेले शेतकरी बांधवाचे आभार गाव कामगार तलाठी औदुंबर शिंदे यांनी व्यक्त केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng