महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम छ. शिवाजी कॉलेजने केले – प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे


सातारा (बारामती झटका)

साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये काम करणे हेच मोठे गौरवाचे आहे, छत्रपती शिवाजी कॉलेज कर्मवीरांनी कोणत्या परिस्थितीत निर्माण केले याचे भान सदोदित ठेवले पाहिजे. कर्मवीरांच्या कर्माने उभी राहिलेली आणि पद्स्पर्शाने पावन झालेली भूमी असून हे उच्च शिक्षण कसे घ्यावे यासाठी प्रेरणास्थान आहे. कर्मवीरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कॉलेजला दिले. या महाविद्यालयात अनेक चांगली माणसे होऊन गेली, शिवाजी विद्यापीठानंतर या माणसांचा ज्ञानक्षेत्रात प्रचंड दबदबा होता. डॉ. एन. डी. पाटील, सु.प्र. दाते हे शिक्षक होते, लेखक होते, अभ्यासक वक्ते होते. पतंगराव कदम, रामशेठ ठाकूर, माया जाधव यासारखी राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रात काम करणारी स्वतंत्र अस्तित्वे निर्माण झाली. त्या काळच्या शिक्षकांची वैचारिक परंपरा जोपासण्याची आज गरज आहे. महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राला नवी दिशा देणारे काम छत्रपती शिवाजी कॉलेजने केले, असे मत रयत शिक्षण संस्थेचे ऑडीटर व सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी व्यक्त केले. ते छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये गुणवंत शिक्षक व प्रशासकीय सेवक गुणगौरव समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. छत्रपती शिवाजी कॉलेजच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शिक्षक व प्रशासकीय सेवक यांना ते सजग करत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर हे उपस्थित होते. उच्चतर शिक्षा अभियान विभागाचे पुणे विभागाचे सहसंचालक श्री. प्रमोद पाटील यांची मुख्य उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये काम करणे हाच मोठा गौरव आहे, इथे काम करण्याने सात्विक समाधान मिळते, असे सांगून शिक्षकांच्या जबाबदाऱ्याची जाणीव त्यांनी उपस्थिताना करून दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करणारे अनेकजण हे रयत शिक्षण संस्थेचे सचिव होते. ते बहुतांशी सायन्सशी सलग्न असले तरी या महाविद्यालयात काम करण्याची त्यांना आस होती. रयत शिक्षण संस्थेचा उच्च शिक्षण क्षेत्रातील सांस्कृतिक वारसा हे महाविद्यालय आहे, याची त्यांना जाणीव होती. म्हणून शिक्षण समृद्ध करण्याची जबाबदारी आपली आहे. शिक्षकांनी अखंड अध्ययन करावे, अध्यापनाबरोबर संशोधन करावे. समकालीन चांगले बदल आत्मसात करावेत. देवाला रोज उदबत्ती व सुंगधी फुले वाहून आपण नवा सुंगंध घेतो त्या प्रमाणे अध्यापन नाविन्यपूर्ण असावे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून अध्यापन गतिमान करावे. शिक्षकाला ज्ञानाची भूक लागली पाहिजे. संशोधन समाजाभिमुख असावे. पीएच.डी. चे प्रबंध केवळ कपाटात ठेवणार असाल तर उपयोग नाही. संशोधन हे समाजाला उपयोगी ठरावे. सातत्याने लेखन करावे. प्राचार्य डॉ. शिवणकर साहेब यांची आठ पेटंट आहेत. रात्री अडीच पर्यंत ते अभ्यास करून दिवसभर महाविद्यालय, संस्थेचे काम करतात. सेनापती अखंड ज्ञानात मग्न असेल तर आपली जबाबदारी वाढते, असेही ते म्हणाले.

सर्वात महत्वाचा विद्यार्थी आहे असे सांगत ते पुढे म्हणाले की, विद्यार्थी आपल्याकडे आदर्श म्हणून पाहतात. ते आपले वागणे, बोलणे, वेशभूषा, केशभूषा पाहत असतात. ते अनुकरण करतात. म्हणूनच आदर्श व्यक्तिमत्व म्हणून शिक्षकाने रहायला हवे. समाजाने आपल्याला उभे केले हे लक्षात घेऊन सतत देण्याची वृत्ती ठेवावी. देण्याची वृत्ती हीच रयतची संस्कृती आहे. समाजाच्या मनात शिक्षकाविषयी कोणतेही किल्मिष असता कामा नये असे वर्तन हवे. विद्यार्थ्यांच्यातील सुप्त गुणांना शोधून त्यांना संधी निर्माण करून देणे आवश्यक आहे. जागतिकी करणाच्या प्रक्रियेनंतर समाजाच्या सर्व क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे. औद्योगिक, राजकीय तशीच शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा आहे. अशावेळी गंभीर होऊन मुलांच्यात ताकद निर्माण करून क्षमता विकसित करावी. कामावर नितांत श्रद्धा ठेवावी. भान हरपून लेखन करावे. भान ठेवून संशोधन करावे. काल, आज आणि उद्या देखील कठोर परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी निर्माण करणे हे आपले उच्च ध्येय असावे. यासाठी अंतर्मुख होऊन झपाटून काम करण्याची गरज आहे. असेही ते म्हणाले .

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर म्हणाले की, छ. शिवाजी कॉलेजला चांगले काम करणाऱ्या शिक्षकांची गौरवशाली परंपरा आहे. हलाखीच्या काळात कॉलेजची उभारणी करताना ज्या प्राचार्य, शिक्षकांनी काम केले, अशा नावाजलेले प्राचार्य जे आज हयात नाहीत, त्यांची आठवण ठेवून प्रेरणा घ्यावी, यासाठी पुरस्कार ठेवण्यात आले. चांगल्याचे कौतुक व्हावे म्हणून पुरस्कार असतात. ज्यांच्या नावाने पुरस्कार ठेवले त्यांनी चांगले काम केले तरी श्रेयाची अपेक्षा कधी केली नाही. बिरबलाची १८ उंटाची कथा सांगून त्यांनी आपण काम करून देखील श्रेयात गुरफटून जाता कामा नये. आपला उंट वेळीच काढून घेता आला पाहिजे, असे ते म्हणाले. तरीही चांगल्याची कदर केली पाहिजे, नाहीतर त्यांच्या पदरी वैफल्य येते, अन्याय होतो, असे वाटायला लागते. काही अन्याय हे व्हर्टीकल असतात तर काही आडवे हॉरीझोनटल देखील असतात. एकाच लेवलचे असूनदेखील ज्यावेळी काम चांगले करूनही अन्याय होतो ते योग्य नसते. म्हणूनच स्वतः बरोबर सहकाऱ्याला देखील पुढे घेऊन जाता आले पाहिजे. ज्यांनी ट्राफिक जाम केला ते दोषी असतात पण त्यांच्यामुळे जामग्रस्त यांना अनेक अडचणी येतात. पोलीस आल्यानंतर म्हणून पहिले जामकर्त्याला बाजूला सारतात. पर्मनंट शिक्षक व सी.एच.बी. प्राध्यापक याची तुलना केली तर सर्व पात्रता असून देखील सी.एच.बी. वर हा हॉरीझोनटल अन्यायच असतो. चांगले काम करूनही त्यांना फळ मिळत नाही. समान कष्ट केले पाहिजे. कुणावरही अन्याय होता कामा नये. चांगले काम करणारास पुरस्कार देणे ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. चांगल्याचे कौतुक झाले तर अधिक चांगले काम करण्याची भावना आपल्यात निर्माण होते. यासाठी स्पर्धा आवश्यक आहे. पुरस्कारासाठी प्रस्ताव दिला पाहिजे. तुलना झाली पाहिजे. त्यातून अधिक चांगले होण्याची इच्छा बळावली पाहिजे. पुढच्या वर्षी देखील जास्तीत जास्त पुरस्कार अनेकांना मिळावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टाफ वेल्फेअर विभाग प्रमुख डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, उच्चतर शिक्षा अभियानचे डॉ. प्रमोद पाटील यांचे हस्ते विविध पुरस्कार देण्यात आले. प्राचार्य डॉ. एन.एस. मोहिते गुणवंत सेवक पुरस्कार ३००० रुपयांचे पारितोषिक देऊन श्री. सोमनाथ जाधव यांना देण्यात आला. बेस्ट रीडर पुरस्कार डॉ. विकास येलमार यांना देण्यात आला. प्राचार्य डॉ. एस.आर. सूर्यवंशी बेस्ट रिसर्चर अवार्ड [रुपये पाच हजार], डॉ.अनिलकुमार वावरे यांना देण्यात आला. प्राचार्य एस.के. उनउने बेस्ट टीचर अवार्ड रुपये पाचहजार व सन्मानचिन्ह तसेच ज्युनिअर विभागातील शिक्षक श्री. गणेश बन्सीलाल पाटील यांना देण्यात आला. तर सिनिअर कॉलेजमध्ये सर्वोत्कृष्ट गुणवत्ता मिळवल्याबद्दल प्राचार्य डॉ. ए.व्ही. मथ्यू यांना आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानचिन्ह व रुपये पाच हजार डॉ.अनिलकुमार वावरे यांना देण्यात आला. प्राचार्य जी. के. पाटील आदर्श विभाग पुरस्कार अर्थशास्त्र विभागास देण्यात आला. उच्चतर शिक्षा अभियानचे सहसंचालक डॉ. प्रमोद बळवंत पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विक्रमसिंह ननावरे यांना शिवाजी विद्यापीठाने कलर अवार्ड दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. बेस्ट रिसर्च पेपर अवार्ड प्रा. तानाजी देवकुळे यांना देण्यात आला. डॉ. गणेश विष्णू लोखंडे, डॉ. अभिजित पोरे, डॉ. अभिमान निमसे यांनी संदर्भ ग्रंथ लेखन केले त्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. डॉ. सुभाष वाघमारे यांना ‘संविधांनाच्या स्वप्नातलं गाव’ हा कवितासंग्रह लिहिल्याबद्दल सन्मानचिन्ह व रुपये पाच हजार देऊन ‘सर्जनशील साहित्य लेखन अवार्ड’ देण्यात आला. डॉ. अनिलकुमार वावरे व प्रा. किशोर सुतार यांनी लिहिलेल्या ‘कोरोनायन‘ या संदर्भ ग्रंथास रुपये पाच हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. डॉ. सुभाष
कारंडे, ग्रंथपाल एकनाथ झावरे, डॉ. कांचन नलवडे, डॉ. सुभाष वाघमारे, डॉ.रोशनारा शेख यांना विविध संस्थाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले त्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. डॉ. सादिक तांबोळी, डॉ. भूपेंद्र निकाळजे, डॉ. संदीप किर्दत, डॉ. अभिजित पोरे यांची शिवाजी विद्यापीठाचे संशोधक मार्गदर्शक म्हणून निवड झाली. डॉ. संपत पिंपळे यांनी कोरोना योद्धा माहितीपट तयार केला, डॉ. बाबासाहेब कांगुणे, डॉ. सुधाकर कोळी, डॉ. सचिन माने यांनी पीएच.डी. पदवी मिळविली. डॉ. सुभाष वाघमारे, डॉ. सविता मेनकुदळे, डॉ.धनाजी मासाळ, डॉ.अनिलकुमार वावरे, डॉ. पोर्णिमा मोटे, डॉ. शिवाजी पाटील यांची प्रोफेसरपदी पदोन्नती झाली, याबद्दल सर्वाना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आभार डॉ. रामराजे माने देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. गजानन चव्हाण व प्रा. साधना पाटील यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्वेरीच्या दोन विद्यार्थीनींची ‘हेक्झावेअर’ या कंपनीमध्ये निवड
Next articleवेळापूर येथील शाळेत स्व. चंद्रकांतदादा माने देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मोफत स्कूलबॅग वाटप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here