महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांनी बारामती झटका वृत्ताची घेतली दखल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांनी सोलापूर जिल्हाध्यक्षा ॲड. सुप्रियाताई गुंड यांच्याकडे जबाबदारी सोपवली.

संसदरत्न सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, जिल्हाध्यक्षा सुप्रियाताई गुंड, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्षा अश्विनीताई भानवसे यांची सुनीताताई बाबर यांच्या निवासस्थानी भेट.

वेळापूर ( बारामती झटका )

स्वराज्यरक्षक करिअर अकॅडमीचे मालक प्रवीण अभिमन्यू घुले यांनी वेळापूर येथील पीडित महिला सौ. सुनीता संतोष बाबर यांची आर्थिक फसवणूक केलेली असल्याबाबतचे वृत्त बारामती झटका वेबपोर्टलवर प्रसारित करून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्याकडे दाद मागणार असल्याचे सांगून न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्महत्येचे जाहीर केलेले होते. सदरचे वृत्त बारामती झटकाने प्रसिद्ध केल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी दखल घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांनी सोलापूर जिल्हाध्यक्षा ॲड. सुप्रियाताई गुंड यांच्याकडे जबाबदारी सोपवली.

संसदरत्न सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, जिल्हाध्यक्षा सुप्रियाताई गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्षा अश्विनीताई भानवसे यांनी सुनीताताई बाबर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. सदरच्या वस्तुस्थितीची माहिती जिल्हाध्यक्ष सुप्रियाताई गुंड यांना सांगितल्यानंतर सुप्रियाताई यांनी फसवणुकीचा गुन्हा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्याप्रमाणे सूनिता बाबर व अश्विनी भानवसे यांची प्रक्रिया सुरू आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई, आणि रमाबाई यांच्या लेकींना हक्कासाठी झगडावे लागत आहे, अशी परिस्थिती झालेली आहे. सूनिता बाबर यांनी अनेकांचे उंबरडे झिजवले मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही. शेवटी सावित्रीच्या लेकी धावून आलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटलेली आहे. सध्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रियाताई गुंड आणि अश्विनीताई भानवसे पीडित महिला सुनीताताई बाबर यांच्या पाठीशी आहेत. योगायोगाने सोलापूर ग्रामीणच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम आणि पाठपुरावा करणाऱ्या जिल्हाध्यक्ष सुप्रियाताई गुंड ॲडव्होकेट आहेत. अश्विनी भानवसे यांच्याशी चर्चा करीत असताना सूनिता बाबर यांना आशेचा किरण वाटत आहे.

बारामती झटका वृत्तपत्राने दिलेल्या बातमी अशी होती कि, स्वराज्य रक्षक करियर अकॅडमीचे मालक श्री. प्रवीण अभिमन्यू घुले रा. शिरवली, ता. बारामती, जि. पुणे यांनी आर्थिक फसवणूक केलेली असून सुनिता बाबर यांच्यावर आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे. पीडित महिला सौ. सुनिता संतोष बाबर महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांच्याकडे रीतसर तक्रार करून दाद मागणार असल्याचे सांगितले.
वेळापूर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाशेजारी सौ. सुनीता संतोष बाबर कायमचे राहत आहेत. त्यांचा खाजगी खानावळीचा व्यवसाय आहे. त्याच्यावर त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालत असते. वेळापूर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी स्थळावर मोठे पटांगण आहे. या ठिकाणी श्री प्रवीण अभिमन्यू घुले रा. शिरवली, ता. बारामती यांनी स्वराज्य रक्षक करिअर अकॅडमी सुरू केली होती. सदर ठिकाणी मुलांना भरतीपूर्व प्रशिक्षण, पोलीस भरती, मिलिटरी भरती, नेव्ही, तलाठी, बीएसएफ, सीआरपीएफ, एअर ऑफिसर, रेल्वे भरती वनरक्षक, तटरक्षक अशा विविध भरतीसाठी विद्यार्थ्यांची अकॅडमी वेळापूर येथे चालवत होते. त्यावेळेस त्यांना सौ. सुनिता बाबर यांची मेस असल्याचे समजल्यानंतर त्यांनी 2019 पासून अकॅडमी मधील विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण व नाष्टा देण्यास सुरुवात केली. माफक दरामध्ये सौ. सुनीता बाबर यांनी दोन वेळचे जेवण व नाष्टा त्यामध्ये पोहे, उकडलेली अंडी असा दिला जात असत. प्रतिमहिना एका व्यक्तीस 2600/- रुपये प्रमाणे मुलांना दर्जेदार घरगुती जेवण मिळत होते. एक वर्ष व्यवस्थित हिशोबाप्रमाणे विद्यार्थ्यांकडून घुले सर घेऊन नोव्हेंबर 2020 पर्यंत देत होते. मात्र त्यापुढे होणाऱ्या बिला पेक्षा दरमहा कमी कमी रक्कम देऊन आज देतो, उद्या देतो, पुढच्या वेळेला देतो, असे म्हणत लांबवत गेले. कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा वेळच्या वेळेवर नाष्टा व जेवण देण्याचे काम सुरू होते. पहिल्यापासून सौ. सुनीता बाबर यांनी दैनंदिन जेवण केलेल्या विद्यार्थ्यांचे हिशोब ठेवलेले होते. थकित रक्कम वाढत चाललेली होती, तशी सौ. सूनिता बाबर यांची परिस्थिती गरिबीची असल्याने त्यांनी नातेवाईक व हातउसने घेऊन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना नाष्टा व जेवण देण्याचे काम सुरू केले होते. प्रवीण घुले यांना पैसे मागितल्यानंतर ते वेगळीच कारणे सांगत होते. यासाठी स्थानिक पुढारी यांच्याकडे पैशाची तक्रार केली होती. त्यावेळेस प्रवीण घुले यांनी लवकरच पैसे देतो, असे सांगितले होते. वेळोवेळी फोन केले, त्यावेळेस त्यांनी पैसे देण्याचे कॉल रेकॉर्डमध्ये नमूद झालेले आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणाचे 2 लाख 80 हजार रुपये ( 2,80,000 ) थकित बिल आहे. तारखेसहित विद्यार्थ्यांच्या नावासह दैनंदिन रेकॉर्ड आहे. आम्ही घरातील कामामुळे वेळेवर जेवण करत नव्हतो मात्र, विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण देत होतो. तरीसुद्धा आमचा कष्टाचे पैसे घुले सर यांनी ठेवले. असे असताना सदरील अकॅडमी पंढरपूर येथे विसावा मंदिरा शेजारी इसबावी तालुका पंढरपूर येथे घेऊन गेलेले आहेत. त्यांना फोनवर संपर्क केला असता कशाचे पैसे, अशी उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे दोन मुले व आजारी पती यांच्यासह सामूहिक आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही. कारण हात उसने घेतलेले पैसे नातेवाईक यांच्याकडून आणलेले पैसे त्यांना गरज असल्याने मागत आहेत. माझ्याकडे सध्या पैसे नाहीत. अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे प्रवीण घुले यांनी महिन्याच्या महिन्याला पैसे जमा करून स्वतः खर्च केलेले आहेत. त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांच्याकडे तक्रार करणार आहे. त्यांना भेटून सविस्तर झालेला प्रकार सांगणार आहे, जर मला न्याय नाही मिळाला, माझे कष्टाचे पैसे मिळाले नाहीत तर आमच्या मृत्यूला प्रवीण घुले सर्वस्वी जबाबदार असतील, असे चिठ्ठी लिहून आम्ही सामूहिक आत्महत्या करणार असल्याचे पीडित महिला सौ .सुनीता संतोष बाबर यांनी केविलवाणी चेहरा व डोळ्यात पाणी आणून सांगितले.

सध्यातरी या प्रकरणाकडे सावित्रीच्या लेकीने लक्ष घातलेले आहे. त्यामुळे निश्चितपणे पीडित महिला सूनिता बाबर यांना न्याय मिळण्यासाठी बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनल समाज माध्यमाचे काम करणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवेळापूर येथे कालकथित सुशीला सरतापे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त विजय सरतापे यांचा भीम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम.
Next articleकण्हेर गावचे माने-पाटील आणि तिरवंडी गावचे वाघमोडे-पाटील यांचा शुभमंगल कार्य सोहळा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here