स्वेरीमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा
पंढरपूर (बारामती झटका)
लोकांच्या कल्याणासाठी पेटवलेली ज्योत म्हणजे ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ या आहेत आणि त्यांचा वारसा आज आपल्या समाजातील महिला पुढे नेत आहेत. आजच्या महिला हया ‘चूल आणि मुल’ या चाकोरीबाहेर जाऊन पुरुषांच्या कार्याला हातभार लावत आहेत. एकूणच महिलांना नोकऱ्यांच्या बाबतीत समान संधी मिळते. तरीही महिलांना आपण कुठेतरी कमी पडतो असे वाटत असते. कालांतराने आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांचे विश्व चाकोरीबद्ध झाले आहे. पूर्वीच्या वेळी मर्यादा होत्या परंतु, त्या आता कमी झालेल्या आहेत. पूर्वी सर्व महत्वाचे निर्णय पुरुष घेत होते. आता वेळ बदलली, काळ बदलला, पिढी बदलली, त्यामुळे महिलांना समान संधी मिळत आहे. ‘महिला दिन’ साजरा करण्यासाठी समाजातील सर्वांनी एकत्र येवून साजरा करण्याची गरज आहे. महिला सशक्तीकरण हा आपल्या रोजच्या आचरणाचा भाग बनावा’ असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शमा पवार यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शमा पवार या बहुमोल मार्गदर्शन करत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे हे होते. प्रारंभी महिलांच्या शिक्षणासाठी ऐतिहासिक कामगिरी केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रास्ताविकात स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे म्हणाले की, महिलांना समाजात मानाचे स्थान असून तसेच त्यांनी उचललेली जबाबदारी मोठी असून प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे महिलांचा भक्कम आधार असतो. असे सांगून प्राचार्य डॉ. रोंगे यांनी कर्तबगार महिलांच्या कार्यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे म्हणाले की, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची शिकवण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला उत्तमरित्या दिलेली आहे. संत नामदेव, संत जनाबाई यांनी देखील समाजमनावर उत्तम संस्कार केले. आज मुला-मुलींना समान अधिकार देण्याबाबतचे कायदे आहेत. प्रत्येक वारकऱ्यांना आपण ‘माऊली’ म्हणतो आणि ही शिकवण १३ व्या शतकातच मिळाली. एकूणच आज चांगल्या ठिकाणी महिला कार्यरत आहेत आणि चांगल्या गोष्टींचा विसर पडू नये यासाठी ‘कृतज्ञतेचे सोहळे’ व्हायला हवेत.’
या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वेरीत प्रथम वर्ष अभियांत्रिकीमधील ३१ गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना एकूण तीन लाख पन्नास हजार नऊशे अठ्यान्नव रुपयांची बक्षिसे रोख स्वरूपात वितरीत करण्यात आली. यावेळी महिला सशक्तीकरणाबाबत उपस्थितांकडून शपथ घेण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार मनोजकुमार श्रोत्री, सर्कल ऑफीसर मोरे तसेच स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांच्यासह स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, अभियांत्रिकीचे विद्यार्थी सचिव आदित्य गोखले, फार्मसीच्या विद्यार्थिनी सचिवा स्वाती सलगर यांच्यासह चारही महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng