मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात उपासमारी बंद करून माणुसकी दाखवणार का ? संतप्त कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा सवाल…
मांडवे ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील क्षेत्रफळांमध्ये सर्वात मोठी व प्रतिष्ठेची असणारी मांडवे ग्रामपंचायत आहे. मांडवे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा एक वर्षापेक्षा जास्त दिवस पगार झालेला नाही. मोलमजुरी व हातावरचे पोट असणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी व माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात उपासमारी बंद करून माणुसकी दाखवणार का ? असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांमधून केला जात आहे.
मांडवे ग्रामपंचायतची १९५२ साली स्थापना झाली आहे. त्यामध्ये कार्यरत असणारे कर्मचारी, सेवानिवृत्त मयत झालेले आहेत. गेल्या वीस वर्षापासून ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये आनंदा जगू पालवे, तानाजी पंढरीनाथ पर्वते (कोळी), दत्तात्रय भगवान गायकवाड, गुणवंत पांडुरंग ढोबळे असे ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत हद्दीतील अस्वच्छता, साफसफाई, पाणीपुरवठा अशी विविध कामे रात्रंदिवस करीत असतात. कोरोनासारख्या महाभयंकर महामारीच्यावेळी अनेक लोक घरामध्ये होते. मात्र, कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर होते. गावामध्ये स्वच्छता व पाणीपुरवठा अशा जनतेच्या हिताची कामे दैनंदिन कर्मचारी करीत असतात. रात्रंदिवस ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये कामे करावे लागत असतात. त्यामुळे त्यांना घरातील कामे करण्यासाठीसुद्धा वेळ मिळत नाही. घरामध्ये असणारी बायका, मुले यांच्यावर पगार नसल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व विस्ताराधिकारी यांनी कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेणे गरजेचे आहे. मात्र, टक्केवारीमध्ये गुंतलेल्या अधिकाऱ्यांना गोरगरीब कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मांडवे ग्रामपंचायतमधील कर्मचारी एक वर्षापासून पगार नसल्याने अडचणीत आहेत. माळशिरस तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींची काय अवस्था असेल देव जाने, कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांनी लक्ष देऊन संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना पगार न दिल्याबद्दल प्रशासकीय कारवाई करून पीडित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी आर्त हाक पीडित कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांकडून येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng