इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व राजकीय दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेणार याची उत्सुकता शेतकरी वर्गाला व सभासदांना लागली होती. मात्र, या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना लि. बिजवडी, ता. इंदापूर, जि. पुणे हा कारखाना कै. शंकरराव पाटील उर्फ भाऊ व कै. लीलावती पाटील यांच्या ताब्यात असताना काटकसरीने चालवून कर्जमुक्त केला होता. सभासदांचे आणि ऊस उत्पादकांचे हित जोपासले जात होते. परंतु, हा कारखाना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आल्यापासून कारखान्यात सहकार हे फक्त नावालाच राहिलेले असून हा कारखाना खाजगी कारखान्यांप्रमाणे चालवला जात आहे. सभासद व ऊस उत्पादक यांच्यावर अन्याय करून ऊस दर इतर कारखान्यांच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपये टनाला कमी दिला जात आहे. या कारखान्याच्या नावावर नवीन मशिनरी खरेदी करून त्या मशनरी स्वतःच्या खाजगी कारखान्यात बसवणे तसेच ऊस वाहनांचा करार कर्मयोगी ला करणे व प्रत्यक्ष या वाहनाने ऊस वाहतूक स्वतःच्या खाजगी कारखान्यात करून या वाहनांचे वाहतूक पेमेंट कर्मयोगी मधून करणे अशा गैरकारभारामुळे या कारखान्यावर खूप मोठा कर्जाचा बोजा स्वतःचे खाजगी कारखाने चालवण्यासाठी केलेला आहे.
ऊस उत्पादकांचे पेमेंट जानेवारीपासून आज अखेर ९ महिने कारखान्यानी केलेले नाहीत. कामगारांचे १० महिन्याचे पगार थकीत आहेत. त्यामुळे कामगारांचे संसार उघड्यावर आले आहेत. विरोधी गटातील ऊस उत्पादकांना जाणून बुजून सभासद केलेले नाही. त्यांच्या अनामत रकमा भरून घेतल्या आहेत परंतु, त्यांना सभासद केले नाही. तसेच विरोधी गटातील सभासदांचे उस जाणूनबुजून पाच वर्षे नेलेले नाहीत आणि ऊस पुरवठा केलेला नाही म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आलेले आहे. तसेच वारसाहक्काने विरोधी सभासदांच्या वारसांना सभासद करून घेतलेले नाही.
कारखान्यातील मोठ्या गैरकारभारामुळे कारखाना निवडणूक लढवून जिंकून जरी आणला तरी कारखान्याचा कारभार चांगल्या पद्धतीने करता येईल, अशी स्थिती दिसत नाही. सहकार क्षेत्रातील मोठा अनुभव असणारी खूप मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. परंतु अशा योग्य व चांगल्या लोकांचे जाणीवपूर्वक सदस्यत्व रद्द करून त्यांना उमेदवारीपासून कायदेशीररित्या दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनुभव नसलेल्या उमेदवारांचा पॅनल उभा करून फक्त राजकारणासाठी राजकारण करणे योग्य वाटत नाही. साखर कारखाना हा राजकारणाचे माध्यम नसून गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रपंच चालू होण्याचे साधन आहे. तसेच कारखान्याची परिस्थिती ज्यांनी बिकट केली आहे, त्यांनीच या कारखान्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखाना नफ्यात आणणे गरजेचे आहे. म्हणून याचा विचार करून या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा करणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. असे स्पष्टीकरण प्रसिद्धीपत्रकाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng