सरकारच्या मालकीची गायरान गावठाण जमिनी नागरिकांच्या मालकी हक्क करून गेला.
जालना (बारामती झटका)
शासकीय गायरान जमिनी गावातील नागरिकांच्या मालकी हक्काच्या करून दिल्या प्रकरणी ७ माजी सरपंच, निवृत्त गटविकास अधिकारी व ५ निवृत्त ग्रामसेवकांना हायकोर्टाने दणका दिला असून त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील सरकारच्या मालकीच्या गावठाण जमीनी नागरिकांच्या मालकीच्या केल्याप्रकरणी हायकोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
जालन्यातील टेंभुर्णी गावातील गट क्रमांक ११९५ व २५९ यासह गावठाणातील ३२८ एकर जागा सरपंच, गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी संगनमत करून गावातील एकूण ७०० नागरिकांच्या मालकी हक्काच्या करून दिल्या होत्या. यासाठी सरकारच्या विविध दस्तऐवजात बनावट नोंदी करत ग्रामपंचायतीच्या रेकॉर्ड व गाव नमुना नंबर ८ मध्ये या ७०० लोकांना सरकारी जमिनीचा मालकी हक्क देण्यात आला होता. या सर्व घोटाळाप्रकरणी फकीरचंद खांडेकर यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. लोकायुक्तांनी संबंधित अधिकारी व सरपंचावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ही कारवाई होत नसल्यामुळे खांडेकर यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार या प्रकरणात पी. आर. मोरे रा. टेंभुर्णी, पी. ए. तांबीले रा. वेणी, ता. लोणार, जि. बुलढाणा, पी. पी. तायडे रा. भडगाव, ता. जि. बुलढाणा, आर. बी. साळवे रा. वरूड (बु.), ता. जाफराबाद, ई.एम. थोरात हे निवृत्त ग्रामविकास अधिकारी. जाफराबाद पंचायत समितीतील माजी गटविकास अधिकारी जी. एस. सुरडकर, तत्कालीन सरपंच पी. एस. वाघमारे, वज्रोदिन कमृद्दिन सिद्दिकी, संध्या देशमुख, साळुबाई धनवई, संगीता शिंदे, लक्ष्मण शिंदे आणि विष्णू जमदाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng