‘माझं डोळे झाकण्याआधी उपअधीक्षक भूमी अधिकारी यांचे डोळे उघडावे’, श्रीमती पार्वती भोसले यांची प्रशासनाला आर्त हाक…

उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पत्राला उपअधीक्षक भुमिअभिलेख कार्यालयाकडून केराची टोपली.

पुरोगामी महाराष्ट्रात वयोवृद्ध महिलांची हेळसांड करणाऱ्या अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याकरिता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शेत जमीन धारणाची कमाल मर्यादा अधिनियम 1975 तसेच वक्त कायद्यातील सुधारणा अधिनियम 2011 चे 28-1 अ अंतर्गत महाराष्ट्र शासनाने दि. 2 फेब्रुवारी 2012 अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करून मूळ खंडकरी अथवा त्यांचे वारस यांचेकडून अर्ज मागवून शासनाने खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी वाटप केलेल्या आहेत. त्यामध्ये अमृत नाटेकर समिती प्रमुख क्रमांक 1 तथा उपविभागीय अधिकारी माळशिरस यांनी श्रीमती विठाबाई बाळू सावंत यांना सदाशिवनगर हद्दीतील गट क्रमांक 217 या गटातील 0.52 आर क्षेत्र दि‌ 06/01/2015 रोजी आदेश देऊन श्रीमती विठाबाई बाळू सावंत यांचे 7/12 वरती दप्तरी नोंद झालेली आहे. मात्र, सदर क्षेत्र त्यांना उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडून मोजणी होऊन हद्दी खुणा करून मिळण्यासाठी वयोवृद्ध महिलेने अनेक हेलपाटे मारले.

मात्र, भूमिअभिलेख कार्यालयाकडून डोळेझाक होत आहे. थकलेल्या वयोवृद्ध महिलेची आर्त हाक आहे, माझं डोळे झाकण्याआधी भूमी अधिकारी यांचे डोळे उघडावे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून आलेल्या पत्राला उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून केराची टोपली मिळत आहे. यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लक्ष द्यावे अशी, विनंती वयोवृद्ध श्रीमती पार्वती लक्ष्‍मण भोसले यांची जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासनाला आहे.

श्रीमती पार्वती लक्ष्मण भोसले यांनी दि. 08/07/2021 रोजी प्रांत कार्यालय यांच्याकडे शेवटचा अर्ज केलेला आहे त्याप्रमाणे प्रांत कार्यालयाकडून तहसीलदार यांच्यामार्फत सर्कल व तलाठी यांचा अहवाल मागवून डॉ. विजय देशमुख उपविभागीय अधिकारी यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांना दि‌. 22/02/2022 रोजी पत्र देऊन आदेश दिलेला आहे.
सदर पत्रात श्रीमती पार्वती लक्ष्मण भोसले महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्यादित सदाशिवनगर येथील गट नंबर 217 मधील जमिनच क्षेत्रातील मोजणी होऊन कब्जा मिळण्याबाबत विनंती केलेली आहे.

सदर प्रकरणी तहसीलदार माळशिरस यांचे मार्फत चौकशी करण्यात आली असून त्यांचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. मौजे सदाशिवनगर ता. माळशिरस गट नंबर 217 मध्ये पार्वतीबाई लक्ष्‍मण भोसले यांचे क्षेत्रात मारुती निवृत्ती सुळ हे अतिक्रमण करून पीक घेत असल्याचे नमूद केले आहे. तरी मौजे सदाशिवनगर येथील गट नंबर 217 क्षेत्र 22 हेक्टर 43 आर या संपूर्ण गटाची मोजणी हद्दी खुणा करून संबंधित खंडकरी शेतकऱ्यांना वारसदारांना वाटप केलेल्या क्षेत्राबाबत अतिक्रमित क्षेत्र काढून ताबा देणे आवश्यक आहे. तरी विषयांकित सदाशिवनगर येथील संपूर्ण गटाची मोजणी व हद्दी खुणा करून नकाशासह पूर्तता अहवाल या कार्यालयाकडे सादर करावा, असे पत्र देऊनसुद्धा उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडून प्रांताधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दिलेली आहे.

श्रीमती पार्वती लक्ष्‍मण भोसले यांची गरीब परिस्थिती आहे. त्यांना माळशिरस येथील भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे वयोमानाने होत नाहीत. शरीर जीर्ण होत चाललेले आहे. अशा वयोवृद्ध महिलेची हेळसांड पुरोगामी महाराष्ट्रात होत असेल तर लोकप्रतिनिधींनी अशा मुर्दाड अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि वयोवृद्ध महिलेला न्याय मिळवून द्यावा अन्यथा वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक महिलेला प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करावे लागेल, असे मत श्रीमती पार्वती लक्ष्‍मण भोसले यांनी निराशाजनक व केविलवाणा चेहरा करून सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान – पोलीस उपअधीक्षक श्री. बसवराज शिवपुजे
Next articleतुकडेबंदीवर राज्य सरकार ठाम, औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here