माळशिरसकरांना कोणत्याही संकटात आठवतोय “राम”, मात्र रावण प्रवृत्तीची होतेय घालमेल

माळशिरस ( बारामती झटका )

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विजयदादा यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात सामान्यांचा आमदार म्हणून राम सातपुते काम करत आहेत. गरिबांची सेवा,
कुणाची भूमी अभिलेख कार्यालयातील अडचण, कुणाच्या रेशन कार्डची अडचण, कुणाच्या संजय गांधी निराधार योजनेची अडचण, वीज बिलाचा प्रश्न असेल अथवा पाण्याची अडचण, एक फोन केला की त्यावर हमखास काम होणार, असा विश्वास आता माळशिरस तालुक्यातल्या सामान्य शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवक वर्गात वाढत चालला आहे. हा फोन आहे आमदार राम सातपुते यांचा !

“भाऊ, असं असं हे काम होतच नाही, खूप दिवस झाले अधिकारी टाळाटाळ करत आहेत,” एवढं जरी सांगितलं तर पुढच्या काही मिनिटांत थेट अधिकाऱ्याला फोन जातो अन ते काम सरळमार्गी तातडीने पूर्ण होतं. हा अनुभव एक, दोन नाही तर आता माळशिरस तालुक्यातल्या सर्वसामान्य शेकडो व्यक्तींना येतोय.
राम सातपुते हे आमदार म्हणून माळशिरस मतदारसंघातून निवडून आल्यानंतर माळशिरसकरांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. तरुण तडफदार आणि शेतकरी कुटुंबातून आलेला एक युवक आमदार झाल्यानंतर त्यांनी त्याच ताकतीने आणि बेधडक काम करण्याच्या अपेक्षा होत्या आणि त्याला राम सातपुते खरे उतरले आहेत.

विकासकामाच्या बाबतीतही अगदी वेगाने कामे सुरू आहेत, कोट्यवधींचा निधी आणत मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. रस्ते, गटार, वीज, पाणी एवढेच नाही तर भौतिक सुविधांसह मोठमोठ्या प्रकल्पावरही काम सुरू असल्याचे आमदार राम सातपुते सांगतात.
माळशिरस तालुक्याच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणताही कार्यक्रम असो, निरोप पोहचला की आमदार हजर! रात्री – अर्ध्या रात्री जरी फोन केला तरी अडचण सुटणार. एक पत्र, एक फोन, एक मेसेज यावर वाऱ्याच्या गतीने काम करणारा आमदार मिळाल्याचा आनंद माळशिरसकरांच्या चेहऱ्यावरून लपून राहत नाही. सामान्य व्यक्तींना आडकाठी आणून त्रास देऊ पाहणाऱ्या किंवा प्रकरण अथवा काम प्रलंबित ठेवून हेलपाटे मारायला लावणाऱ्या अधिकाऱ्यांची इथे खैर नाही.

मागे आमदार राम सातपुते यांनी भूमी अभिलेख कार्यालयात थेट धडक देत अधिकाऱ्यांना फैलावर घेत उग्र रूप धारक केले होते. शासकीय रुग्णालयातही एकदा अशीच भेट दिली होती, वीज बिल वसुलीच्या प्रश्नावर थेट महावितरणलाच आव्हान देत जाग्यावरच मार्ग काढत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सुद्धा आ. राम सातपुते यांनी केले होते. शेतकऱ्यांच्या सुखात धावून जाणारे राम सातपुते त्यांच्या संकट काळातही मागे राहत नाहीत. मग अवकाळी पावसाने झालेले नुकसान असो नाही तर वीज बिलाच्या कचाट्यात सापडलेला शेतकरी असो. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही राम सातपुते यांनी आक्रमक रूप धारण करत माळशिरसच्या रुग्णालय भरती, पाणी प्रश्न यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर आवाज उठवत सरकारचे लक्ष वेधून घेतले होते.
एका बाजूला राजकीय वजन वाढत असतानाच राम सातपुते यांची आरोग्य सेवा अगदी जोमाने सुरू आहे. तालुक्याचा कानाकोपऱ्यातून गरजू, गरीब रुग्ण राम सातपुतेंना फोन करतात, भेटतात अन त्यांच्या लाखोंच्या शस्त्रक्रिया तातडीने अगदी मोफत केल्या जातात, त्याही पुणे – मुंबईसारख्या शहरातल्या नामांकित रुग्णालायत. यामुळे राम सातपुते यांच्याबद्दल सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला आपुलकी आणि आदर वाटतोय.

आ. राम सातपुते माळशिरसच्या शासकीय विश्रामगृहात भेटायला उपलब्ध असतात तेव्हा तो परिसर गर्दीने फुलून गेलेला असतो. सार्वजनिक अडचणी, तक्रारींपासून ते अगदी कौटुंबिक अडचणीही नागरिक या राम दरबारात हक्काने सांगत असतात. अडचणी आणि संकटात गढून आलेला माणूस विश्रामगृहातून बाहेर घरी जाताना तोंडात चहाचा गोडवा घेऊन काम झाल्याच्या समाधानाने हसत निघतो. याच सहज, साध्या, कर्तव्यदक्ष, प्रेमळ, पारदर्शक, आक्रमक आणि विकसनशील स्वभावामुळेच माळशिरसकरांना कोणत्याही संकटात आठवतोय “राम”! त्यामुळे रावण प्रवृत्तीची होतेय घालमेल. रामाची प्रजा रामाच्या कामावर समाधानी आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअमृत महोत्सवी फळझाडे वृक्ष, फुलपीके, मसाल्याची पिके, औषधी व सुगंधी वनस्पती लागवड योजनेचा प्रारंभ – सतीश कचरे, मंडल कृषी अधिकारी, नातेपुते
Next articleधक्कादायक प्रकार : शेतकऱ्याच्या पिक कर्ज मागणी अर्जावर अधिकारी व कर्मचारी यांनी परस्पर कर्ज काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here