माळशिरसच्या सपकाळ परिवाराची हॉटेल व्यवसायातून मेडिकल व्यवसायाकडे वाटचाल.

शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी कष्ट व प्रामाणिकपणाच्या जोरावर अनेक उद्योग व्यवसायातून प्रगतीपथावर सपकाळ परिवार.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायत हद्दीमध्ये रेणुका हॉटेल, स्वीट होम आणि कोल्ड्रिंक्स या व्यवसायामध्ये यशस्वी व्यवसाय सुरू असून सपकाळ परिवाराने मेडिकल व्यवसायाकडे वाटचाल केलेली आहे. ‘रेणुका मेडिकल’ म्हसवड रोड, माळशिरस येथे दि. 3/1/2022 रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मेडिकल व्यवसायाचा शुभारंभ केलेला आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी कष्ट व प्रामाणिकपणाच्या जोरावर अनेक उद्योग व्यवसायातून सपकाळ परिवार यांनी आपली प्रगती साधलेली आहे.
माळशिरस शहरामध्ये सर्वसामान्य व शेतकरी कुटुंब असणारे राजाराम व सुभद्राबाई असे दाम्पत्य होते. त्यांना तीन मुले दत्तात्रय, महादेव व शिवाजी व मुली अशी अपत्य होती. सर्वसामान्य व गरीब परिस्थिती असल्याने राजाराम शेती महामंडळाच्या विभागामध्ये जनावरांचे दुध काढण्याचे काम करीत असत तर सुभद्राबाई पाच रुपये हजेरी मध्ये रोजंदारीवर काम करण्यासाठी जात असत. अशा प्रतिकूल परिस्थितीत दत्तात्रय, महादेव व शिवाजी यांचे शिक्षण दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करून पूर्ण केले. दत्तात्रेय यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी वाढली, त्यामुळे त्यांना शाळेत शिकता आले नाही. महादेव यांना एम. ए. बी. एड. शिक्षण पूर्ण करून शिक्षक म्हणून नोकरी लागलेली आहे तर शिवाजी यांनासुद्धा ज्यादा शिक्षण न घेता उद्योग व्यवसायाकडे वळावे लागले.

दत्तात्रेय सपकाळ यांनी रस्त्यावर सायकल दुकान व्यवसाय सुरू करून पंचर काढणे, सायकल दुरुस्त करणे, अशी छोटी मोठी कामे करत त्यांनी ज्यूस सेंटर सुरू केले. त्यामध्ये लस्सी, सरबत, आईस्क्रीम अशी विक्री करून हळूहळू हॉटेल व्यवसायाकडे वळले. त्यानंतर त्यांनी खानावळ सुरू केली. दत्तात्रय सपकाळ यांनी पुणे येथे फळे विक्रीचा व्यवसाय केलेला आहे. शहरामध्ये घटस्थापनेच्या वेळी लागणारी काळी मातीची विक्री त्यांनी डोक्यावर पाटी घेऊन घरोघरी माती विक्री केलेली होती. कोणत्याही व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे काम केल्याने दिवसेंदिवस त्यांची आर्थिक स्थिती सुधारत चाललेली होती. पहिल्यापासून संघ परिवाराच्या विचाराचे असल्याने महाराष्ट्रामध्ये युतीचे सरकार असताना 1995 साली माळशिरस शहरात एसटी स्टँड परिसरात झुणका भाकर महाराष्ट्र शासनाचे अधिकृत केंद्र मिळाले. त्यामधूनही सपकाळ परिवार यांनी प्रामाणिकपणे गोरगरिबांची सेवा करीत आपली प्रगती साध्य केली. एसटी स्टँड परिसरात रेणुका हॉटेल स्वीट होम आणि कोल्ड्रिंक्स सुरू केले होते. यशस्वी उद्योगानंतर त्यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, म्हसवड रोड येथे रेणुका हॉटेलची दुसरी शाखा सुरू केली. दत्तात्रेय सपकाळ यांना रवींद्र आप्पा व अनिल दादा हे दोन चिरंजीव, महादेव यांना चैतन्य, तर शिवाजी यांना साकेत उर्फ माऊली हे चिरंजीव आहेत. चैतन्य जनता बँक शाखा सोलापूर येथे कार्यरत आहे, माऊली उर्फ साकेत याने डी फार्मसी पूर्ण केलेले आहे. हॉटेलचा व्यवसाय रवींद्र आप्पा आणि अनिलदादा या राम लक्ष्मणाच्या बंधूने चांगल्या प्रकारे करून सपकाळ परिवारांची प्रगती साधलेली आहे. माळशिरस शहरामध्ये दोन रेणुका हॉटेल, राहण्याकरता घर असून, रेणुका रेसिडेन्सी वन बीएचके असणारे दहा प्लॉटची बिल्डिंग आहे. सध्या त्यांच्याकडे तवेरा, इनोवा गाड्या आहेत. काही दिवसापूर्वी राजाराम यांचे दुःखद निधन झालेले आहे. आपल्या मुलांनी, नातवांनी केलेली प्रगती राजाराम आणि सुभद्राबाई यांनी पाहिलेली आहे. मेडिकलचा शुभारंभ राजाराम यांना पाहता आला नाही मात्र सुभद्राबाई यांना पाहता आला. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सपकाळ परिवारांनी हॉटेल व्यवसायातून मेडिकल व्यवसायाकडे वाटचाल केलेली आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये चांगल्या डॉक्टरांची आवश्यकता असते त्यांना रुक्मिणी हॉस्पिटलचे डॉ. मोहन जगताप व डॉ. ज्योती जगताप यांची साथ मिळणार आहे. जगताप डॉक्टर दाम्पत्य नातेवाईक असल्याने मेडिकल उद्योग व्यवसायामध्येही सपकाळ परिवार गगन भरारी घेतील. अनेक मान्यवरांनी रेणुका मेडिकलला भेट देऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत. दत्तात्रय सपकाळ यांचे मित्र, परिवार, नातेवाईक यांनी वेळात वेळ काढून उद्घाटन समारंभ खास हजेरी लावलेली होती.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचेकडून ज्ञानराज उर्फ माऊली पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Next articleमाळशिरस नगरपंचायतीच्या निवडणुकीत 4 जागेसाठी 37 उमेदवारांनी 46 अर्ज दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here