राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेत राष्ट्रवादीच्या परिवारातील अंतर्गत वाद उफाळून येणार.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान तालुका अध्यक्ष माणिकबापू वाघमोडे तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतरावजी पाटील यांच्याकडे देणार असल्याचे बारामती झटक्याशी बोलताना सांगितले.
तालुका अध्यक्ष माणिकबापू यांनी पुढे बोलताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांनी माझ्यावर जबाबदारी दिलेली होती. तालुका अध्यक्ष पदावर काम करीत असताना सर्व समाज घटकांना बरोबरीत घेऊन काम केलेले आहे. मात्र, नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तालुक्यातील स्वयंघोषित नेत्यांनी अंतर्गत गटबाजी करून तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे, त्यामुळे तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.
महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ होत असताना भाजपमधील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून गेलेले होते. अशा अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीतच राहिले, अशापैकीच मी एक कार्यकर्ता आहे. माझ्याकडे तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली होती. लोकसभा व विधानसभा निवडणुक यशस्वीरित्या सांभाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इमानेइतबारे काम केलेले होते. नगरपंचायत निवडणुकीत नातेपुते व माळशिरस या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले असते. मात्र, राष्ट्रवादीतील स्वयंघोषीत काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कमी केलेले आहे. मी तालुका अध्यक्ष असताना मला विचारात घेऊन नगरपंचायत निवडणूक पार पडणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अशीच गटबाजी राहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ठपका माझ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. देशाचे नेते शरदचंद्रजी पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या विचारापासून कदापी बाजूला जाणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद यात्रा माळशिरस तालुक्यात प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील तसेच महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यावेळेस माझा राजीनामा देणार आहे. राजीनामा मंजूर करावा अशी, माझी विनंती आहे. राजीनाम्याच्या प्रति देशाचे नेते व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठवणार असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकबापू वाघमोडे यांनी बारामती झटक्याशी बोलताना सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng