शिक्षण विस्ताराधिकारी महालिंग नकाते यांचा सेवानिवृत्तीनिमित्त तालुकास्तरीय सन्मान सोहळा
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासात गेल्या 28 वर्षात शिक्षण विस्ताराधिकारी महालिंग नकाते यांचे बहुमूल्य आणि कौतुकास्पद योगदान राहिले आहे, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील यांनी काढले. ते माळशिरस तालुका सत्कार समितीच्या वतीने अक्षता मंगल कार्यालय, माळशिरस येथे आयोजित महालिंग नकाते आणि उज्जवला नकाते यांच्या सपत्नीक सन्मान सोहळ्यात बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सभापती शोभा साठे, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, उपसभापती प्रतापराव पाटील, निवृत्त शिक्षणाधिकारी आर. जी. पाटील, व्याख्याते बी. एम. पाटील, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, अनिल बदे आदी उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यासह माढा आणि पंढरपूर तालुक्यात 28 वर्षे शिक्षण विस्ताराधिकारी म्हणून त्यांनी प्रभावी सेवा केली. जिल्हा परीक्षेच्या शंकरराव मोहिते पाटील गुणवत्ता विकास अभियान, स्मार्ट पीटी प्रशिक्षण, भरीव शैक्षणिक उठाव, स्वच्छ सुंदर शाळा अभियान आदी उपक्रमात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी काही काळ माळशिरस पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी म्हणूनही प्रभावी काम केले होते.

यावेळी आर. जी. पाटील, बी. एम. पाटील, धनंजय देशमुख, भागवत पैलवान गुरुजी सांगोला यांच्यासह शिक्षक नेते बाळासाहेब काळे, सुरेश पवार, विठ्ठल काळे, तुकाराम वाघमोडे यांनी आपल्या मनोगतीतून नकाते यांच्या कार्याबद्दल गौरौद्गार काढून शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना महालिंग नकाते यांनी शिक्षकांना बदलत्या काळात आवाहने पेलण्यासाठी अपडेट राहण्याचा आग्रह केला. माळशिरस तालुक्यातील यशस्वी सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी जि. प. सदस्य अरुण तोडकर, तात्या गुळवे, गायकवाड, माजी पं. स. सदस्य सुहास गाडे, माळीनगर दि सासवड एज्युकेश सोसायटीचे संचालक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासह माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर तालुक्यातून केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल नष्टे यांनी केले तर सुत्रसंचालन राजाराम गुजर आणि सुहास उरवणे यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng