माळशिरस, नातेपुते आणि महाळूंग नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापैकी कोणत्या पक्षाची सत्ता आहे, असे लोकप्रतिनिधी पक्षीय वरिष्ठ नेत्यांना काय सांगणार ?
माळशिरस ( बारामती झटका )
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. माळशिरस तालुक्यात नातेपुते व महाळुंग नव्याने अस्तित्वात आलेल्या व माळशिरस जुनी नगरपंचायत असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या लोकप्रतिनिधींना असणारे पक्षाचे लेबल काढावे लागणार का ? असा सवाल राजकीय वर्तुळामध्ये चर्चिला जात आहे. कारण माळशिरस, नातेपुते आणि महाळुंग नगरपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाडी करण्यामध्ये कल असल्यामुळे तिन्ही नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याची सत्ता आहे, असे वरिष्ठ नेत्यांना तालुक्यातील लोकप्रतिनिधी काय सांगणार असाही सवाल उपस्थित होत आहे.
माळशिरस तालुका माढा लोकसभा मतदारसंघात येत आहे. माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आहेत तर माळशिरस विधानसभेचे आमदार रामभाऊ सातपुते आहेत. माळशिरस तालुक्यातील रणजितसिंह मोहिते पाटील विधान परिषदेवर आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार प्रशांत परिचारक आहेत. खासदार व तीन आमदार भाजपचे आहेत. माळशिरस पंचायत समिती भाजपची आहे. सोलापूर जिल्हा परिषद भाजपची आहे. केंद्रात सत्ता देखील भाजपचीच आहे. एवढे असताना तिन्ही नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील असा राजकीय अंदाज होता. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. माळशिरस तालुक्यातील महाळुंग गावासह 14 गावाचे प्रतिनिधित्व करणारे माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनराव शिंदे हेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. पदवीधर मतदार संघाचे आमदार अरुण लाड हेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे. महाराष्ट्राच्या महाविकास सरकारमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. यामुळे नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडणुका लढविल्या जातील, असा राजकीय अंदाज होता.
माळशिरस तालुक्यातील नगरपंचायत निवडणुकांमध्ये स्थानिक आघाड्या तयार करण्यास सुरुवात झालेली आहे. भाजप व राष्ट्रवादीची ताकद असताना पक्षाच्या चिन्हावर निवडणूका का लढल्या जाणार नाहीत याचाही वरिष्ठ पातळीवरून विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकप्रतिनिधींची कानउघडणी वरिष्ठ पातळीवरून होऊ शकते, त्यामुळे निवडणूक पक्षाच्या चिन्हावर का ? असा स्थानिक आघाडी यावर निवडणुका लढल्या जातील याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng