उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रती हितसंबंधांमुळे वाहनधारकांचा धुमाकूळ.
अकलूज ( बारामती झटका )
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याचा हेतू बाजूला राहिला आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या आर्थिक हितसंबंधामुळे माळशिरस तालुक्यात वाळू, मुरुम, दगड वाहनधारकांचा धुमाकूळ माजलेला आहे. सर्वसामान्य जनता व त्रस्त नागरिक यांना माळशिरस तालुक्यात आरटीओ कार्यालय आहे, हे सांगायला लाज वाटत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया जनतेमधून येत आहे.
माळशिरस तालुक्यातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग जात आहेत. दोन्ही मार्गाचे विस्तारीकरण होऊन महामार्गात रूपांतरित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महामार्गासाठी लागणाऱ्या मुरूम व दगड याचे उत्खनन करून वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहने रस्त्याने वाहत आहेत. अनेक ठिकाणी हाय गतीने चालवून अपघात झाले आहेत. त्यामुळे जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. आरटीओ कार्यालय ‘रडक्याचे डोळे पुसले’ यासारखे कारवाई करत असते आणि मंथली पाकिटाला मेळ घालत असतात.
सध्या माळशिरस तालुक्यात म्हसवड येथून बेसुमार वाळू वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक राजरोसपणे रात्रंदिवस सुरू आहे. या गोष्टींकडे पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे. मात्र, आरटीओ अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत. वाहनांमध्ये वाळूचा परवाना नसेल तर पोलिसांना कारवाई करता येते, क्षमतेपेक्षा जास्त वाहनामध्ये दगड, मुरूम, वाळू असल्यानंतर कारवाई करता येत नाही. यासाठी आरटीओची गरज असते. मात्र, आरटीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे हात बरबटलेले असल्याने कारवाई करण्यासाठी हात घसरत असतात, अशी जनतेची भावना झालेली आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तालुक्यातील प्रत्येक रस्त्यावर खाजगी फंटर नेमून खाजगी व्यक्तींकडून मंथली वसूल केली जाते, अशी खुलेआम जनतेमध्ये चर्चा सुरू आहे. रस्त्याने जाणाऱ्या एकाही अवजड वाहनाला कार्ड दिल्याशिवाय जाऊ दिले जात नाही. कार्ड दिल्यानंतर एक महिना सदरचे वाहन माळशिरस तालुक्यातून अवजड वाहतूक करीत असते. सदरच्या कार्डावर आपला प्रवास सुखाचा होवो असे लिहिलेले असते. परिवहन मंत्रालयाने जमिनीवर व रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांवर कंट्रोल ठेवण्याकरता प्रादेशिक, उपप्रादेशिक, मोटार वाहन, निरीक्षक मोटार वाहन, सहाय्यक निरीक्षक व कार्यालयीन कर्मचारी यांची नेमणूक केलेली आहे.
अजून हवेतून जाणाऱ्या पशु पक्षांकडून वसुली केली जात नाही, तसे असते तर चिमणीने घरट्यासाठी चोचित गवत अथवा काडी प्रमाणापेक्षा मोठी आणली असती. तर, अकलूजच्या आरटीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी चिमणीकडून सुद्धा वसुली केली असती, अशी खेदाने चर्चा सर्वसामान्य जनतेत सुरू आहे.
शासनाचा महसूल बुडवून म्हसवडवरून बेकायदेशीर वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अकलूज उपविभागीय पोलिस अधिकारी पोलिस उपाधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या पोलीस प्रशासनाबरोबर आरटीओ कार्यालयाने अधिकारी व कर्मचारी दिल्यानंतर संयुक्त कारवाई सुरू केल्यानंतर अवैध अवजड वाहनातील वाळू उपसा बंद होईल. शासनाचा महसूल बुडणारा वाढेल, यासाठी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng