माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सध्या चार वॉर्डासाठी सुरु आहे. ओबीसीमधून ओपन झालेल्या चार वॉर्डापैकी एक वॉर्ड बिनविरोध झालेला असून तीन वॉर्डासाठी निवडणूक सुरू आहे. वॉर्ड क्रमांक पाचमध्ये ॲड. सुमित राजू सावंत हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत असून त्यांचे चिन्ह गॅस सिलेंडर हे असून त्यांनी निवडणूक प्रचारामध्ये आघाडी घेतलेली दिसत आहे. सिद्धार्थनगरमधील वॉर्ड क्र. पाच या प्रभागांमध्ये यापूर्वीच्या नगरसेवकांनी कोणतीही विकास कामे न केल्यामुळे लोकांना ग्रामपंचायत बरी असे म्हणायचे दिवस आलेले होते. तसेच नागरी समस्यांनी वॉर्ड ग्रासलेला असताना नगरपंचायत मात्र बघ्याची भूमिका घेत असून त्याठिकाणी जनतेच्या प्रश्नांवर लढणाऱ्यांची कमतरता दिसत आहे.

ॲड. सुमित सावंत हे माळशिरस कोर्टामध्ये वकिलीचा व्यवसाय करीत असून ते सातत्याने समाजकार्यात मदतीचा हात नागरिकांना देत असतात. त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीचे सिद्धार्थनगर वॉर्ड क्र. पाचमधील सर्वच स्तरातील नागरिकांनी स्वागत केले असून मतदारच उघडपणे ॲड. सावंत यांचा प्रचार करताना दिसत आहेत. वारंवार तेच तेच उमेदवार बघून व त्यांच्या निष्क्रिय पद्धतीचा राग येऊन आम्ही ॲड. सुमित सावंत यांनाच निवडून देणार असा एकंदरीत सूर वॉर्ड क्रमांक पाचमधून दिसत आहे.

वास्तविक, सिद्धार्थनगर म्हणजे कष्टकरी लोकांचा प्रभाग असून या ठिकाणच्या तरुणांच्या हाताला काम नसल्याने अनेक तरुण बेरोजगार झालेले आहेत. या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देऊन स्वावलंबी बनवणार असा निर्धार सुमित सावंत यांनी केला असून तहसिल कार्यालयातील निराधार योजनेच्या निकषात न बसलेल्या महिलांना नगरसेवक निधीतून यापुढे महिन्याला ठराविक रक्कम देणार असे त्यांनी अभिवचन दिले आहे. आपल्या जाहीरनाम्यामध्ये ॲड. सुमित राजू सावंत यांनी नागरिकांना रमाई घरकुलचा लाभ देणे, अभ्यासिका काढणे, जिम्नॅशियम तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सभागृह, रस्ते व दिवाबत्तीची सोय, स्वच्छ व फिल्टरचे मुबलक पाणी, महिला सक्षमीकरण व बेरोजगारी हटाव अशी अनेक कामे करण्याचे अभिवचन दिले आहे. त्यामुळेच सध्या माळशिरस शहरात वॉर्ड क्र.५ मधील ॲड. सुमित राजु सावंत यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू असुन ॲड. सुमित राजु सावंत यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng