अनुसूचित जातीतील पती-पत्नीने सर्वसाधारण जागेवर विजय मिळवून इतिहास निर्माण केला
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस नगरपंचायत अटीतटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे श्री. आबा धाईंजे व सौ. शोभा धाईंजे या पती-पत्नीने देदीप्यमान विजय संपादन करून एकाच वेळी नगरपंचायतीच्या सभागृहात जाण्याचा योगायोग आलेला आहे. विशेष म्हणजे अनुसूचित जातीतील पती-पत्नी यांनी सर्वसाधारण जागेवर विजय मिळवून माळशिरस नगरपंचायतीमध्ये इतिहास निर्माण केलेला आहे.
माळशिरस नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीत सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सौ. संजीवनीताई पाटील यांच्या सहकार्याने सौ.शोभा धाईंजे यांना नगरसेविका होण्याचा बहुमान मिळालेला होता. त्यांनी प्रभागामध्ये अनेक कामे करून जनतेच्या अडचणी सोडविलेल्या होत्या. वेळोवेळी अडचणीतील जनतेला मदत करण्याचे काम पतिराज आबा धाईंजे यांनी केलेले होते.
सध्या प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण जागेसाठी खुला झालेला होता. सदरच्या प्रभागांमध्ये सहा उमेदवार उभे होते. तरीसुद्धा आबा धाईंजे यांना 854 मतदारांपैकी 360 मतदारांनी मतदान देऊन विजयी केलेले आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर प्रभाग क्रमांक पाच हा सुद्धा सर्वसाधारण जागेसाठी खुला झालेला होता. यामध्ये दहा उमेदवार स्त्री-पुरुष उभे होते. यामध्ये सौ. शोभा धाईंजे यांना 873 मतदारांपैकी 302 मतदारांनी मतदान देऊन विजयी केले आहे.
माळशिरस नगरपंचायत निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेत्या सौ. संजीवनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. शोभा धाईंजे व आबा धाईंजे पती-पत्नी यांनी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर दैदिप्यमान विजय मिळवलेला आहे. संजीवनीताई पाटील यांच्या सहकार्याने आबा धाईंजे यांचा राजकीय प्रवास सुरू आहे. आबांचा बांधकाम व्यवसाय करणाऱ्या ठेकेदार अथवा कॉन्ट्रॅक्टर यांना मजूर पुरवण्याचा व्यवसाय आहे. 40 ते 50 मजुरांचा आबांच्या मदतीने प्रपंचास सहकार्य होत आहे. त्यांना समाजामध्ये आदराचे स्थान असून इतर जाती धर्मात सुद्धा आबांचे सलोख्याचे संबंध आहेत. सुसंस्कृत स्वभाव, शुद्ध आचार विचार आणि ज्येष्ठ नेत्या संजीवनीताई पाटील यांचे सहकार्य यामुळेच अनुसूचित जातीमध्ये असताना सुद्धा सर्वसाधारण जागेवर दैदीप्यमान विजय मिळवून नगरपंचायतीच्या सभागृहात एकाच वेळी पती-पत्नी जात असल्याने माळशिरस तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झालेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng