पंचायत समितीने लाभार्थ्यांची यादी डिजिटल बोर्डावर पंचायत समितीच्या बाहेर लावण्याची सर्वसामान्य जनतेची मागणी.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस पंचायत समितीमध्ये अनेक शासकीय व्यक्तिगत लाभाचे खरे लाभार्थी लाभापासून वंचित राहिलेले आहेत. पदाधिकारी यांचे सतरंज्या उचलणारे गोचीड अशा धनदांडग्या लोकांना या योजनेचा लाभ देऊन खरे लाभार्थी वंचित राहिलेले असल्याने माळशिरस तालुक्यामध्ये वंचित लाभार्थ्यांचा आक्रोश सुरू आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषद महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या अनेक व्यक्तिगत लाभाच्या योजना असतात. काही वेळेला ग्रामपंचायतच्या ठरावामधून किंवा पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्या शिफारशीनुसार लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. योजना गोरगरीब व सर्वसामान्य जनतेसाठी असतात मात्र राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी राजकारणासाठी आपले बगलबच्चे व धनदांडगे यांच्या घशात योजना घालत असल्याची भावना सर्वसामान्य जनतेची झालेली आहे.
पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक योजना आहेत. पंचायत समितीने लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी डिजिटल बोर्डावर पंचायत समितीच्या बाहेर प्रसिद्ध करावी म्हणजे खरे लाभार्थी व धनदांडगे यांची खात्री सर्वसामान्य जनतेला होईल, अशा मागणीने जोर धरलेला आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून गाय गोटा, विहीर, घरकुल यांच्यासह शिलाई मशीन, ताडपत्री, कडबा कुट्टी, अशा अनेक वस्तू सदस्यांच्या शिफारशीनुसार अनुदानावर वाटप केलेल्या असतात. अशा सर्व लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करावी, अशीही मागणी सर्वसामान्य जनतेची आहे. पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटाची पुनर्रचना सुरू आहे. अनेक गावांची गट व गणामधून अदलाबदल होणार आहे. पूर्वीच्या सदस्यांनी आपल्या गण व गटांमध्ये लोकांच्यासाठी किती योजना व विकास कामे केली, याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याची गरज असल्याचे सर्वसामान्य जनतेमध्ये बोलले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng