माळशिरस तालुक्यासाठी श्री. अनिल पाटील गटप्रमुख, श्री. देवराव होळी, श्री. सदाभाऊ खोत, श्री. किशोर दराडे, श्री. प्रदीप जयस्वाल आदींचा समितीत समावेश
माळशिरस ( बारामती झटका )
सोलापूर जिल्ह्यामध्ये कालपासून विधिमंडळातील 33 सदस्यांची नेमणूक महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय मुंबई येथील अपर सचिव यांनी केलेली आहे. पंचायत राज समिती प्रमुख संजय रायमुलकर आहेत. काल दि.15 रोजी दिवसभर जिल्हा परिषद येथे सन 2015-16 व 2016 -17 च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवाल आणि सन 2017-18 च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्या अनुषंगाने कामकाजाची चौकशी करून माहिती घेण्यासाठी संयुक्त बैठक झालेली होती. सर्व सदस्यांना जिल्ह्यातील 11 तालुके विभागून दिलेले आहेत. त्यापैकी श्री. अनिल पाटील गटप्रमुख, श्री. देवराव होळी, श्री. सदाभाऊ खोत, श्री. किशोर दराडे, श्री. प्रदीप जयस्वाल आदी 5 सदस्यांची कमिटी माळशिरस, सांगोला, मंगळवेढा अशा तीन तालुक्यासाठी नियुक्ती झालेली आहे. माळशिरस पंचायत समितीमध्ये आज दि.16 रोजी सकाळी 10 वाजता येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी माळशिरस पंचायत समिती सज्ज झालेली आहे.
माळशिरस पंचायत समिती परिसर साफसफाई करून स्वच्छ केलेला आहे. गेटपासून दुतर्फा रांगोळी काढून प्रवेशासाठी खुणा केलेल्या आहे. वाहन पार्किंगसाठी चौकोन आखलेले आहेत. मुख्य प्रवेशद्वारापासून पायघड्या अंथरण्यात आलेल्या आहेत. स्वागताची जय्यत तयारी केलेली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या चौकटीत राहून लोकशाही मार्गाने प्रशासनातील कामकाज सुरू असते. पंचायतराज यामार्फत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचा सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या योजना राबविण्याचे काम सुरू असते. खऱ्या अर्थाने योजना राबवित असताना कशा राबवल्या जातात, यासाठी वार्षिक प्रशासन अहवालाच्या अनुषंगाने समिती कारभार पाहण्याकरता नियुक्ती केलेले असते. समितीसमोर तक्रारीचा अनेक त्रस्त नागरिक पाढा वाचत असतात. त्यांना समितीकडून न्याय मिळत असतो. गैर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गोची होऊन प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागते. पंचायतराज समिती नागरिकांची गाऱ्हाणे ऐकतील का ? अधिकाऱ्यांच्या चहा, नाष्टा व पान सुपारीवर खुश होतील हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng