माळेगाव येथे खजूर लागवडीचा नाविन्यपूर्ण प्रयोग…

बारामती (बारामती झटका)

            बहुतांशी वाळवंटी प्रदेशात केल्या जाणाऱ्या खजूर शेतीचा नाविन्यपूर्ण  प्रयोग बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथील शेतकरी प्रशांत प्रतापराव काटे यांनी यशस्वी करुन शेतीतून लाखो रुपये कमवण्याचा मार्ग या भागातील शेतकऱ्यांना दाखवला आहे, त्यांची ही यशोगाथा…..

माळेगाव खुर्द हे बारामती शहरापासून दहा किमीच्या अंतरावर वसलेले एक खेडेगाव आहे. नीरा डाव्या कालव्यामुळे या गावातील परिसर हिरवागार झाला आहे. येथील बहुतांशी शेतकरी  ऊस, फळलागवड आणि बागायती पीके घेतात.  प्रयोगशील शेतकरी असलेल्या काटे यांना वलसाड, गुजरात येथून खजूर लागवडीची माहिती मिळाली. त्यांनी या पिकासाठी आवश्यक वातावरण आणि होणाऱ्या खर्चाचा अभ्यास करून लागवडीनंतर खजूर शेतीस  खर्च कमी असल्याने पाऊणे दोन एकरात खजूराच्या रोपांची लागवड केली.  लागवडीकरीता त्यांना 6 लाख रुपये खर्च आला. एक रोप  3  हजार 500 रुपये प्रमाणे त्यांनी  गुजरात मधून 113 रोपे 2017 मध्ये  मागवली.

सध्या त्यांच्याकडे  113  झाडे असून ती आता पाच वर्षाची झाली आहेत. खजूराच्या शेतीत त्यांनी आंतरपीक म्हणून पेरु फळझाडाचीही लागवड केली आहे. या वर्षी जुलै/ऑगस्ट मध्ये पीकाची पहिली तोडणी झाली. त्यामधून त्यांना दीड टन उत्पादन मिळाले आणि सर्व  खर्च वजा जाता  दीड लाख रुपये नफा भेटला. जागेवरच खजूराला मागणी आली. नफा चांगला भेटत असल्याने ते आणखीण खजुराची  लागवड करण्याच्या तयारीत आहेत. बारामती तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

 प्रशांत काटे यांच्या मालकी हक्काची 10 एकर बागायती क्षेत्र आहे. खजुर शेतीबरोबरच श्री. काटे डाळिंब, पेरु आणि चिकू या फळांची लागवड देखील करतात. त्यांच्या शेतीला एक प्रकारे अॅग्रो टुरीझमचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. परिसरातील अनेक  शेतकऱ्यांनी त्यांचे मार्गदर्शन घेतले असून अनेक वरिष्ठ अधिकारी यांनी देखील त्यांच्या शेतीला भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे.

जिल्हा कृषि अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे, उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, आत्माचे संचालक किसनराव मुळे, मंडल कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ आदींनी  त्यांच्या खजूर शेतीला भेटी देऊन त्यांना  मार्गदर्शन केले आहे. तसेच कृषि विज्ञान केंद्र, बारामती  येथील रविंद्र कलाने यांचेही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपारिक शेतीत न राहता आधुनिक पद्धतीने शेती केल्यास ती फायद्याची ठरू शकते हेच काटे यांच्या खजूर शेतीच्या यशस्वी प्रयोगाने दाखवून दिले आहे.

खजूराला रोपे लागवाडीपासून 4 वर्षात झाडाला फळे येणे सुरू होते. एका झाडाला कमीतकमी  पहिल्या वर्षाला 20 किलो भरतील इतकी  फळे येतात. पुढे त्याच्यात वाढ होऊन हळूहळू 100 ते 150 किलोपर्यंत फळे भेटतात. साधारणत: खजुराचे झाड  80  ते 100 वर्षे फळे देऊ शकते. खजूर फळे रु. 100 ते 200 प्रती  किलो भावाने विकली जातात. या फळास  पुणे, मुंबई, हैदराबाद व बेंगलरू बाजारात मागणी आहे. एका एकरात साधारणत: 63 झाडे बसतात

प्रशांत काटे, शेतकरी- खजूराच्या  रोपट्याची जगण्याची व फळावर येण्याचे 100  टक्के खात्री असून प्रत्येक झाड 4 वर्षात फळाला येतेच. सुरवातीला एक झाड वर्षाला 2 ते 10  हजाराचे उत्पन्न देते व पुढे त्यात वाढ होते. तसेच व्यावसायिक पद्धतीने शेती केली तर उत्पन्न दुप्पटीने मिळेल. केवळ गायीच्या शेणाने रोपट्याचे पोषण केले जाऊ शकते व सुपीक जमिनीची या पिकाला गरज नसते. – रोहिदास गावडे, माहिती सहायक उप माहिती कार्यालय, बारामती.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजनावरांना लाळ्या खुरकतीचा संसर्ग होऊ नये, म्हणून पशुसंवर्धन विभागाने लस उपलब्ध करावी…
Next articleमाळशिरस नगरपंचायत हद्दीतील भूसंपादनचा प्रश्न चिघळणार मावळची पुनरावृत्ती होणार का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here