मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शिवसेना आमदार यांचं डोळ्यात अंजन घालणारं भावनिक पत्र…

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे हिंदुत्व जपणाऱ्या एकनाथरावजी शिंदे यांच्यासोबत असल्याचे आ. संजय शिरसाट यांचं भावनिक पत्र सोशल मीडियावर व्हायरल.

मुंबई (बारामती झटका)

आमदार संजय शिरसाट यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डोळ्यात अंजन घालणारं भावनिक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी पक्षामध्ये कशा प्रकारची वागणूक आमदारांना मिळत होती, आमदारांवर दुजाभाव होवून कसा अन्याय होत होता, हे सांगितलं आहे. हे पत्र सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.

सदर पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि, काल वर्ष बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजुला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्ष बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना  भेटतात, पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.

मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे, अशी अनेकवेळा विनंती केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलावले असा निरोप बडव्यांकडून यायचा. पण, तासनतास बंगल्याच्या गेटवर उभा ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसीव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे ?

हीच सर्व हालअपेष्टा आम्ही सर्व मतदारांनी सहन केली. आमची व्यथा आपल्या आजूबाजूच्या बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्यापर्यंत ती पोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदारसंघात असलेली वाईट परिस्थिती, मतदारसंघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान.. आमची ही सर्व गा-हाणी पक्षात फक्त शिंदे साहेब ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही हा निर्णय घ्यायला लावला.
हिंदुत्व, आयोध्या, राममंदिर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना ? मग आता आदित्य ठाकरे आयोध्येला गेले तेव्हा आम्हाला आयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं ? तुम्ही स्वतः फोन करून अनेक आमदारांना आयोध्येला जाऊ नका, असं सांगितलं. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते. आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की, आमदारांना आयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वतः परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की, साहेबांचा फोन आला होता. आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते, मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला. आम्हाला रामलल्लांचे दर्शन का घेऊ दिले नाही.

साहेब, जेव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते, मतदारसंघातली काम करत होते. निधी मिळाल्याचे पत्र नाचवत होते. भूमिपूजन आणि उद्घाटन करत होते. तुमच्या सोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की, मुख्यमंत्री आपला आहे ना, मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो ? त्यांची काम कशी होतात ? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय द्यायचं, या विचाराने जीव कासावीस व्हायचा.

या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं, माननीय बाळासाहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हिंदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील, या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत.
काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणार हे भावनिक पत्र लिहावं लागलं.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजिल्हा पुरवठा अधिकारी सौ. वर्षाताई लांडगे यांनी माळशिरस तालुका स्वस्त धान्य संघटनेचे अध्यक्ष विजय मंडलिक यांचा केला सन्मान.
Next articleजनसामान्यांच्या संघर्षासाठी उभे राहणारे झुंजार नेतृत्व म्हणजे लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here