श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान संपन्न झाले.
माळशिरस ( बारामती झटका )
मेडद गावचे जागृत ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्राउत्सव उत्साही व भक्तिमय वातावरणात संपन्न झालेला आहे. यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेले भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान यशस्वीरित्या पार पडलेले आहे. श्री काळभैरवनाथ यात्रेच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी रात्री 10 ते 12 या वेळेमध्ये गाण्यांच्या गजरात देवाचा लग्नसोहळा होतो व त्यानंतर मध्यरात्री 2 ते 7 यावेळी मध्ये उंबरे दहिगाव या ठिकाणावरून चालत पालखी व घोडा घेऊन पाणी घेवुन येतात व पुजारी यांच्याहस्ते मानाची पूजा व आरती केली जाते.

दुसऱ्या दिवशी सकाळी 07 ते 10 यामध्ये पुरणपोळी नैवेद्य दाखवला जातो. तसेच दिवसभरात मेडद व मेडद परिसरातील ग्रामस्थ पाहुणे यांचे दर्शनासाठी ये-जा सुरू राहते. रात्री साडेआठ वाजता देवाची आरती केली जाते. तिसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून श्री काळभैरवनाथाचा गजी ढोल गजरात छबिना निघतो. यामध्ये मेडद व मेडद परिसरातील ग्रामस्थ पाहुणेमंडळी सर्वजण यामध्ये सहभागी होतात. दुपारी 12 वाजता रथ देवळात आल्यानंतर आरती केली जाते. दुपारी 03 ते 07 या वेळेमध्ये सालाबाद प्रमाणे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान जिल्हा परिषद शाळा मेडद येथे भरविण्यात आले होते.

सदरचे कुस्ती मैदान यशस्वी करण्याकरता श्री भैरवनाथ यात्रा कमिटी ग्रामपंचायत मेडद व समस्त ग्रामस्थ यांनी नेटके नियोजन केले होते. सदरच्या कुस्ती मैदानामध्ये पन्नास रुपयापासून एक लाखापर्यंत कुस्त्या नेमण्यात आलेल्या होत्या. गावातील सर्व राजकीय मंडळी जगताप, तुपे, लवटे पाटील, झंजे व इतर सर्व गावातील गट-तट मतभेद बाजूला ठेवून श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव मोठ्या थाटात संपन्न करीत असतात.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्ग रोगाच्या थैमानामुळे शासनाने यात्रा उत्सव यांच्यावर बंदी घातलेली होती. मात्र यावर्षी यात्रा भरलेली असल्याने मेडद व पंचक्रोशीतील नागरिक व त्यांचे नातेवाईक यांच्यासह श्री काळभैरवनाथ श्रद्धास्थानी असणाऱ्या लोकांनी मनोभावे दर्शन घेऊन मेडदकरांनी यथेच्छ भोजनाचा व कुस्त्यांचा लाभ घेतला. श्री काळभैरवनाथ यात्रेला प्रचंड भाविक भक्तांचा जनसमुदाय गोळा झालेला होता.

अनेक लोकांनी जागृत देवस्थानाला नवस बोलले असल्याने नवस फेडण्यासाठी आलेले होते. काही लोक मनामध्ये इच्छा धरुन आलेले असतात. श्री काळभैरवनाथ देवाच्या रथावर गुलालाची उधळण करीत अतिशय भक्तीमय व उत्साही वातावरणात कोणत्याही प्रकारे गालबोट न लागता यात्रा शांततेत पार पडली. यासाठी वेळापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवलेला होता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
