माजी सरपंच रामचंद्र चौगुले यांची चेअरमनपदी तर, माजी उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड
भाजपचे मोहिते पाटील गटाला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार मिळाला नाही, अशी दुर्दैवी वेळ आली…
खुडूस ( बारामती झटका )
खुडूस विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सन 2021-22 ते 2026-27 या कालावधीसाठी माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र आबा ठवरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खुडूस ग्रामपंचायतचे लोकप्रिय माजी सरपंच रामचंद्र मुरलीधर चौगुले यांची चेअरमन पदी तर माजी उपसरपंच डॉ. तुकाराम बापू ठवरे यांची व्हाईस चेअरमन पदी सर्वानुमते बिनविरोध निवड संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये करण्यात आली. सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. कोरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बी. डी. जरे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यात आली.
खुडूस विविध कार्यकारी सेवा सोसायटीची शतकाकडे वाटचाल सुरू असताना मोहिते पाटील गटाची एक हाती असणाऱ्या सत्तेवर माजी सभापती मच्छिंद्र आबा ठवरे पाटील गटाचा झेंडा फडकला आहे. सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या नेत्यांना उमेदवारी अर्ज भरण्याकरता उमेदवार मिळाला नाही, अशी दुर्दैवी वेळ सेवा सोसायटीमध्ये मोहिते पाटील गटावर आली आहे. खुडूस विविध कार्यकारी सेवा सोसायटीची स्थापना 08/12/1925 साली झाली असून संस्थेचे पहिले चेअरमन श्रीधर जोशी होते. संस्थेचे 90 वर्ष चेअरमनपदाची धुरा एकाच घराकडे राहिलेली आहे. लक्ष्मण नामदेव ठवरे, विष्णू लक्ष्मण ठवरे, शंकर लक्ष्मण ठवरे असे तीन चेअरमन एकाच घरातील होते. महादेव देविदास ठवरे व दत्तू दाजी ठवरे यांनी एक एक वर्ष चेअरमन पदाची धुरा सांभाळलेली आहे. संस्थेस 97 वर्ष पूर्ण झालेली असून शतकाकडे वाटचाल सुरू असताना नव्वद वर्ष एकाच घराकडे चेअरमन पदाची धुरा असताना साधा एक उमेदवार निवडणुकीसाठी मोहिते पाटील गटाला मिळालेला नाही.
माजी सभापती मच्छिंद्र आबा ठवरे पाटील यांना सभासद येऊन भेटले. आपण सोसायटीमध्ये लक्ष द्यावे, असा आग्रह केल्यानंतर मच्छिंद्र आबा गटाच्या सर्व नेत्यांनी यामध्ये लक्ष घातलेले होते. संस्थेची दीड कोटी वार्षिक उलाढाल आहे. संस्थेला स्वतःची इमारत नाही. संस्थेने कधीही डिव्हिडंड दिला नाही. संस्थेचे सभासद 443 आहेत. पात्र मतदार सभासदांनी मोठा निर्णय घेऊन संस्थेचे बिनविरोध संचालक मंडळ निवडून दिलेले आहे.
सर्वसाधारण कर्जदार खातेदार गटात रामचंद्र मुरलीधर चौगुले, शंकर बापू काळे, अविनाश भागवत ठवरे, श्रीमंत कृष्णा कारंडे, बाबुराव निवृत्ती ठवरे, शौकत दिलावर शेख, हनुमंत कृष्णा ठवरे, नामदेव माणिक खरात, महिला राखीव प्रतिनिधी गटात जनाबाई सदाशिव झंजे, जिजाबाई सुखदेव बोरकर, अनुसूचित जाती जमाती गटात छाया नामदेव कांबळे, भटक्या विमुक्त विशेष जाती जमाती प्रवर्गात तुकाराम बापू ठवरे, इतर मागासवर्ग गटात बाळू बापू बनकर असे तेरा संचालक बिनविरोध निवडून आलेले होते.
अडचणीत असलेल्या संस्थेला अडचणीतून बाहेर काढण्याकरता खुडूस गावचे कर्तव्यदक्ष व विकास प्रिय माजी सरपंच रामचंद्र चौगुले यांची चेअरमन पदी निवड व कार्यसम्राट माजी उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. सभासदांना विश्वास आहे, संस्थेचा कार्यकाल शतकाकडे जात असताना सभासदांना डिव्हीडंट मिळणार. सभासदांचे हित लक्षात घेऊन संस्थेचा कारभार चेअरमन रामचंद्र चौगुले, संस्थेचे सचिव अनिल हनुमंत दोलतडे यांचेकडून करून घेतील असा सभासदांना विश्वास वाटत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng