रत्नत्रय पतसंस्था देणार सभासदांना 15 टक्के लाभांश

मांडवे (बारामती झटका)

पतसंस्था पतसंस्थेस सन 2021-22 या आर्थिक वर्षात 22 लाख 21 हजार 316 रुपये निवळ नफा झाला असून सभासदांना यावर्षी 15 टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक श्री. अनंतलाल दोशी यांनी 18 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली.

यावेळी संस्थेचे संस्थापक श्री. अनंतलाल दोशी, चेअरमन श्री. विरकुमार दोशी, व्हा. चेअरमन श्री. संजय गांधी, संचालक प्रमोद दोशी, अजय गांधी, रामदास गोपने, संजय दोशी, अजितकुमार दोशी, सचिव ज्ञानेश राऊत यांसह सर्व सभासद उपस्थित होते.

यावेळी प्रस्ताविकामध्ये बोलताना पतसंस्थेचे कर्तव्यदक्ष संचालक श्री. प्रमोद दोशी यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेतला व संस्था देत असलेल्या सेवांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. संस्थेमार्फत व्यापाऱ्यांसाठी कमी पैशात भारतात कुठेही आरटीएस व एनएफटी सोय, डीडी काढण्याची सोय, लाईट बिल व फोन बिल भरण्याची सोय, क्यूआर कोडमार्फत पैसे भरण्याचे सोय अशा विविध सेवा संस्थेमध्ये चालू आहेत. तरी या सर्व सेवेचा लाभ सभासदांनी व ठेवेदारांनी घ्यावा, असे यावेळी त्यांनी सांगितले.

त्यानंतर संचालक मंडळाच्या हस्ते भगवान महावीर व माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी कै. शंकररावजी नारायणराव मोहिते पाटील, राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अनंतलाल (दादा) दोशी हे होते. त्यांचा सत्कार संस्थेचे सभासद बबन गोपने यांनी केला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, पतसंस्थेची स्थापना 2004 साली परिसरातील छोट्या/मोठ्या व्यवसायिकांना सुलभ रीतीने कर्ज मिळावे, त्याची उन्नती व्हावी या उद्देशाने पतसंस्थेची स्थापना करण्यात आली असून या संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व सभासद ठेवेदार हितचिंतक, संचालक व कर्मचारी वर्ग यांचा मोठा मोलाचा सहभाग आहे. ही पतसंस्था सगळ्यांना चांगली सेवा देत आहे. आर्थिक व्यवहाराबरोबर ही संस्था अनेक सामाजिक कार्यही करून समाजसेवा करीत आहे.

पतसंस्थेचे चेअरमन श्री. विरकुमार (भैया) दोशी यांनी अहवाल वाचन करून पतसंस्थेत दि. 31 मार्च 2022 अखेर एकूण ठेवी 17 कोटी 78 लाख 26 हजार इतक्या असून कर्ज वाटप 14 कोटी 50 लाख 88 हजार इतके वाटप केले आहे. संस्थेचे खेळते भाग भांडवल 23 कोटी 11 लाख 29 हजार रुपये इतके असून संस्थेची गुंतवणूक 7 कोटी 37 लाख 56 हजार इतकी आहे. संस्थेचे एकूण वसुल भाग भांडवल 42 लाख 88 हजार रुपये इतके आहे. तसेच संस्थेचे एकूण उत्पन्न 2 कोटी 8 लाख 78 हजार रुपये असून एकूण खर्च 1 कोटी 86 लाख 57 हजार इतका झाला आहे. संस्थेत चालू वर्षी 22 लाख 21 हजार 316 रुपये निव्वळ नफा झालेला असून संस्थेची वार्षिक उलाढाल 109 कोटी 42 लाख रु झाली आहे. संस्थेत चालू वर्षी ऑडिट वर्ग अ मिळाला असून संस्थेने 15% टक्के लाभांश जाहीर केलेला आहे.

यावेळी संस्थेचे सचिव श्री. ज्ञानेश राऊत यांनी सभेपुढील विषय वाचन करून संस्थेच्या आर्थिक पत्रकाची माहिती त्यांनी यावेळी सभासदांना दिली. सालाबादप्रमाणे याही वर्षी वेळेवर येणाऱ्या सभासदांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला होता. यामध्ये प्रथम क्रमांक श्री. मुकुंद कापसे, द्वितीय क्रमांक श्री. संतोष राजमाने व तृतीय क्रमांक श्री. वीरकुमार गुरव यांना अनुक्रमे बक्षिसे लागले. तर सर्व हजर सभासदांना एक भेटवस्तू देण्यात आली.

यावेळी आभार प्रदर्शन संस्थेचे सभासद श्री. वैभव शहा यांनी मानले. अशाप्रकारे संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. वार्षिक सभा पार पाडण्यासाठी रत्नत्रय इंग्लिश स्कूल, पतसंस्थेचे कर्मचारी व पिग्मी एजंट यांचे विशेष सहकार्य लाभले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleउंबरे दहिगाव येथे ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले, धामणगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार
Next articleसोलापूर मेडिकल असोसिएशनमध्ये दीपक पाटणे यांचा सत्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here