मांडवे (बारामती झटका)
सालाबादप्रमाणे याही वर्षी रत्नत्रय परिवारातर्फे तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान फेटा, श्रीफळ, डायरी व पेन देऊन म्हसवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री. नितीन दोशी यांच्या शुभहस्ते रत्नत्रय स्कूल मांडवे या ठिकाणी करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नत्रय परिवाराचे संस्थापक श्री. अनंतलाल (दादा) दोशी, प्रमुख पाहुणे समन्वयक रोटरी क्लब ऑफ पुणे चे श्री. वैभव पोरे, सरपंच दादासाहेब गावडे, चेअरमन शिंदे साहेब, शेख सर, पुरंदावडे गावचे सरपंच देविदास ढोपे, श्री सन्माती सेवा दलाचे संस्थापक श्री. मिहीर गांधी, रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन विरकुमार दोशी, श्री शंकर सहकारी कारखान्याचे संचालक रामदास करणे, मेट्रो एजन्सीचे अध्यक्ष श्री. विजय गांधी हे मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नत्रय स्कूलचे चेअरमन प्रमोद दोशी यांनी केले. रत्नत्रय पतसंस्था व रत्नत्रय परिवार यांच्यावतीने गेली पंधरा वर्षे पत्रकार यांचा सत्कार करण्यात येत असतो. या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व पत्रकार उपस्थित राहतात. यामध्ये सुनील राऊत, अनंत दोशी ,श्रीनिवास कदम पाटील, एल. डी. वाघमोडे, विलास साळुंखे, संजय हुलगे, संजय देशमुख, समाधान मिसाळ, बंडु पालवे, तानाजी वाघमोडे, आनंद लोंढे, आनंद जाधव, स्वप्नील राऊत व सौ. शोभा वाघमोडे या सर्व पत्रकारांचा सन्मान या वेळी करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्रीनिवास कदम पाटील व बंडू पाटील म्हणाले की, रत्नत्रय परिवाराचे काम खरंच कौतुकास्पद आहे. दरवर्षी न चुकता आम्हा सर्व पत्रकारांचा सत्कार ते घेत असतात. तसेच केलेल्या कामाचे कौतुक ते करत असतात आणि त्याच बरोबर आमच्या सर्वांची काळजी म्हणून ते सर्व पत्रकारांना एक लाख रुपयाचा विमा ही दरवर्षी देत असतात. यामुळे पत्रकारितेचे काम करताना आम्हा सर्व पत्रकारांना एक ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा देण्याचे काम रत्नत्रय परिवार दरवर्षी करत असतो. रत्नत्रय परिवारातर्फे विविध कार्यक्रम घेतले जात असतात, असे चांगल्या प्रकारची कामे त्यांच्या हातून होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे चे समन्वयक माननीय श्री. वैभव पोरे यांच्यावतीने 50 इंची 2 एलसीडी टीव्ही संचाचे व इयत्ता पाहिले ते दहावी वर्गाचे इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाचे अभ्यासक्रम सॉफ्टवेअर शाळेसाठी भेट दिला. त्याचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे नितीन दोशी व वैभव पोरे यांनीही रत्नत्रय पत्संस्था, रत्नत्रय इंग्लिश स्कूल व रत्नत्रय परिवार करीत असलेल्या कामाचे कौतुक करून एका छोट्या ग्रामीण भागात पहिली ते बारावी पर्यंत विनाअनुदानित शाळा चालवत असल्याबद्दल अनंतलाल (दादा) दोशी व प्रमोद दोशी व वीरकुमार दोशी यांचं कौतुक केले. असेच आपल्या हातून विविध सामाजिक कार्य घडत राहो, यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच या वेळी श्री. नितीन दोशी यांनी शाळेसाठी एक कॉम्प्युटर संच भेट देण्याचेही घोषित केले.

अध्यक्षीय भाषण करताना श्री. अनंतलाल दोशी म्हणाले की, आपण सर्वजण आमच्या रत्नत्रय परिवाराच्यामागे खंबीर उभे असल्यामुळे आम्ही हे सामाजिक कार्य करीत आहोत, आणि हाती घेतलेले हे कार्य कायम करत राहणार आहोत. आपण सर्वजण जी आम्हाला मदत करता त्याबद्दल आम्ही आपले शतशः आभारी आहोत असे ते म्हणाले. तसेच सर्व पत्रकारांना नवीन वर्षाच्या व पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांना चांगले आरोग्य लाभो, अशी सदिच्छाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी संजय दोशी, संतोष गुरव, बाहुबली दोशी, दत्ता भोसले, रामदास गोफणे, वैभव शहा, नितेश फडे, सौ. रेश्मा गांधी, उमेश निंबाळकर हे सर्वजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ज्ञानेश राऊत व मुख्याध्यापक दैवत वाघमोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चेअरमन विरकुमार भैया दोशी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी रत्नत्रय स्कूल व रत्नत्रय पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng