सातारा (बारामती झटका)
रयत शिक्षण संस्था ही बहुजनांची संस्था आहे. ती नियमानुसार चालणारी संस्था आहे, ती महाराष्ट्रातील आदर्शवत संस्था आहे. रयतने नेहमी समानतेचा स्वीकार केला आहे. देशातील सर्व संस्थांनी रयत शिक्षण संस्थेचा आदर्श घ्यावा. कर्मवीरांनी जे शैक्षणिक सुधारणेचे व ग्रामीण विद्यापीठाचे स्वप्न पाहिले ते महाविकास आघाडी सरकार पूर्ण करील, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. नामदार उदय सामंत यांनी दिले. ते रयत शिक्षण संस्थेच्या १०२ व्या वर्धापन दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. रयत शिक्षण संस्थेने येथील यशवंतराव चव्हाण इन्सटीट्युट ऑफ सायन्स या महाविद्यालयात या समारंभाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील होते तसेच माजी खासदार रामशेठ ठाकूर, मा.आमदार बाळाराम पाटील, कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. हेमंत कटरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रयत शिक्षण संस्थेच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, केवळ ३० रुपये व 4 विद्यार्थी घेऊन सुरु झालेल्या रयत शिक्षण संस्थेत आज साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.केजी पासून पीजी पर्यंत शिक्षण देत ग्रामीण भागात ज्ञानदान करणारी ही संस्था केवळ शिक्षण देत नसून ती विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवीत आहे. विविध संस्थाशी सामंजस्य करा करून ती विद्यार्थ्याचे भवितव्य घडवीत आहे. ती विद्यार्थ्यांना रस्त्यावर सोडत नाही. हीच जाणीव ठेवून रयतचा कारभार होत राहिला तर रयतचे ग्रामीण विद्यापीठ पाहण्यासाठी परदेशी शिक्षण तज्ञ इथे येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्यासाठी जशी चरित्र लेखन साधनसमिती स्थापित करण्यात आली तशीच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने चरित्र लेखन समिती स्थापित करून त्यांच्या चरित्राचे खंड विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध व्हावेत यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासूनचा आढावा घेतला. रयत शिक्षण संस्थेच्या जोपासनेत प्रबोधनकार ठाकरे यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या स्थापनेच्या वेळी झालेल्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात प्रबोधनकार ठाकरे होते. प्रबोधनकार आणि कर्मवीर यांचे जिव्हाळ्याचे संबध होते. कर्मवीरांनी अनेकदा शिवजयंतीला व्याख्यान देण्यासाठी त्यांना साताऱ्यात आणले होते. महात्मा गांधी यांची भेट घेऊन रयत शिक्षण संस्थेचे काम हे कर्मवीर भाऊराव पाटील कसे तळमळीने करतात हे त्यांनी गांधीजीना पटवून दिले होते. त्यामुळे हरिजन सेवक संघाच्या निधीतून दर वर्षाला पाचशे रुपये रयत शिक्षण संस्थेला मिळत होते असेही ते म्हणाले. रयत शिक्षण संस्थेला महाराष्ट्र शासनाचे मोठे सहकार्य असल्याचे सांगून आज जागतिकीकरणाच्या काळात ज्या स्पर्धा निर्माण झाल्या आहेत ते लक्षात घेऊन रयत पुढच्या काळात स्वायत्त महाविद्यालये वाढवणार आहे. त्यासाठी शासनाने संस्थेला सहकार्य करावे. रयतच्या ४२ महाविद्यालयासाठी स्वतंत्र विद्यापीठ द्यावे. काळानुसार बदल करायचे असतील तर खाजगी शिक्षण संस्थाशी आपली स्पर्धा वाढणार आहे. आम्हाला शासनाने संसाधने उपलब्ध करून दिली तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी रयत प्रयत्न करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या समारंभाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत ज्यांनी महत्वाचे योगदान दिले अशा विविध कार्यकर्त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ठेवण्यात आलेल्या विविध पारितोषिकाची माहिती संस्थेचे ऑडीटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी दिली. एन.आय.आर.एफ मध्ये देशात पहिल्या १५० मध्ये स्थान मिळवणारे वाय.सी., कॉलेज सातारा, ए प्लस ग्रेड प्राप्त करणारे माढा कॉलेज, इनोव्हेशन, स्टार्ट अप पेटंट इत्यादीमध्ये विशेष कार्य करणारे डी.पी. भोसले, कोलेज कोरेगाव या तिन्ही महाविद्यालयाच्या शाखाप्रमुखांचा यावेळी सत्कार करण्यात आला. चौदा पेटंट मिळवणारे प्रा.डॉ. गुरुमित वधवा, शिवाजी विद्यापीठात एम.ए संस्कृतमध्ये प्रथम आलेली महेश्वरी गोळे, वायू सेनेच्या फ्लायिंग ऑफिसरपदी निवड झालेली कू. पूजा शिंदे, तहसीलदारपदी निवड झालेले श्र. अजितराव जंगम, रोझ प्रकल्पात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. नितीन घोडके, एन.टी. एस. परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणारी श्रुतिका मोहोळकर, एन.एम.एम.एस. परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणारा अनुज्ञ वराडे, शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणारी कू. स्वरा टकले व आर.टी.एस. परीक्षेत संस्थेत सर्वाधिक गुण मिळवणारी कू. अनुजा यादव यांचा सत्कार यावेळी
करण्यात आला.
या समारंभाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी केले. आभार सहसचिव प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी मानले. सूत्र संचालन प्रा.डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव मा. संजय नागपुरे, कौन्सिल सदस्य माधवराव मोहिते, अॅड. रवींद्र पवार, मा. प्रभाकर देशमुख, मा. दिलावर मुल्ला, प्राचार्य आर.डी. गायकवाड तसेच रयत शिक्षण संस्थेचे आजी व माजी पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी सोशल डीस्टन्सीग पाळून उपस्थित होते. या समारंभाचे ऑनलाईन प्रसारण करण्यात आले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng