‘रयत शिक्षण संस्थारूपी वटवृक्षाच्या पारंब्या’ चे प्रकाशन

कर्मवीरांच्या कार्यात योगदान देणाऱ्या दानशूर राजे व कार्यकर्त्याचे कार्य उजेडात

सातारा (बारामती झटका)

रयत शिक्षण संस्थेच्या शाखा वाढविण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या ज्या कार्यकर्त्यांनी आपले बहुतांशी आयुष्य समर्पित केले, तसेच कर्मवीर यांचे स्वप्न पूर्ण करताना रयतेचा वटवृक्ष सर्वत्र विस्तारण्यासाठी ज्यांनी अनमोल योगदान दिले, अशा कार्यकर्त्यांच्या कार्याचा चरित्र रूपाने वेध घेणारा ‘रयत शिक्षण संस्थारूपी वटवृक्षाच्या पारंब्या’ हा ग्रंथ प्राचार्य डॉ. विजय नलावडे यांनी लिहिला. या ग्रंथाचे प्रकाशन आज छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ऐतिहासिक अशा फलटण निवास इमारतीत, रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, प्राचार्य रामचंद्र गायकवाड, प्राचार्य आर. के. शिंदे, प्राचार्य शहाजी डोंगरे, प्रा. विठ्ठल लिपारे यांचे हस्ते झाले. या प्रसंगी श्री. बाळकृष्ण शेवाळे, डॉ. महादेव सुभेदार शिंदे, मेजर प्रल्हाद सीताराम गायकवाड, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष वाघमारे, डॉ. पोर्णिमा मोटे, डॉ. अभिमान निमसे, डॉ. अनिलकुमार वावरे, डॉ. रामराजे माने देशमुख, डॉ. रोशनआरा शेख आदी उपस्थित होते. स्टाफ वेल्फेअर विभाग, छत्रपती शिवाजी कोलेज माजी विद्यार्थी संघ, तसेच सातारा इतिहास संशोधन मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

‘रयत शिक्षण संस्थारूपी वटवृक्षाच्या पारंब्या‘ या ग्रंथाबद्दल बोलताना प्राचार्य डॉ. विजय नलावडे म्हणाले की, २०१४ साली मी कर्मवीरांच्या काळात रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासनात असलेल्या त्यागी रयत सेवकांची चरित्रे ‘रयत शिलेदार‘ या ग्रंथाद्वारे लिहिली. संस्थेच्या प्रशासनात नसताना डोंगराएवढे कार्य ज्यांनी केले असे कितीतरी त्यागी कार्यकर्ते कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेच्या पारंब्या होऊन विविध ठिकाणी रयतच्या शाखा निर्माण करत राहिले. अशा २२ व्यक्तीची चरित्रे या ग्रंथात लिहिली आहेत. कर्मवीर विद्या प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक प्राचार्य आर. के. शिंदे व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी चरित्र लेखनासाठी प्रेरणा दिली. रयत शिक्षण संस्थेला १३८ एकर जमीन देणारे श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज, ९८६ एकर जमीन व अनेक वाडे संस्थेला देणारे ग्वाल्हेरचे महाराजा जिवाजीराव शिंदे व सातारा लोणंद येथे जमीन व फलटण येथे निवास इमारत देणारे श्रीमंत मालोजीराजे निंबाळकर, बंडो गोपाळा मुकादम, शंकरराव काळे, प्रा. एन. डी. पाटील, विठ्ठलराव देशमुख, बापूसाहेब व सौ. हिराबाई भापकर, डॉ. धनंजयराव गाडगीळ, कर्जतचे दादा पाटील, धोंडी पाटलू भोसले, मेयर बाबुराव सणस, रामचंद्र तात्या पवार [तडसरकर], दि. बा. पाटील, कॉ. पी. बी. कडू पाटील, रामभाऊ तुपे, वीर वाजेकर, भाऊसाहेब उर्फ बाबासाहेब पाटील, बाळकृष्ण रावजी उर्फ बाळकू अण्णा मोहिते, बी. बी. पाटील, भाई मनोहर पालशेतकर यांचे कार्य उजेडात आणण्यासाठी ध्यास घेऊन काम केले असे ते म्हणाले. रयत शिक्षण संस्थेला सदैव मदत करणारे मा. बाळासाहेब देसाई, क्रांतिसिंह नाना पाटील, वसंतदादा पाटील, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी, बडोद्याचे सयाजीराजे गायकवाड, इंदोरचे होळकर घराणे आणि आणखी अनेक कार्यकर्ते आणि समर्पित व्यक्तिमत्वे यांचेवर अजून स्वतंत्र लेखन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांची एकत्रित ऐतिहासिक चरित्रात्मक माहिती लिहिल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, प्राचार्य आर. डी. गायकवाड, कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे कार्यकारी संचालक प्राचार्य आर. के. शिंदे यांनी प्राचार्य डॉ. विजय नलावडे यांचे अभिनंदन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपुणे विभागातील 19 लाख 53 हजार 43 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
Next articleजलसंपदामंत्री ना. जयवंतराव पाटील यांच्या शुभहस्ते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील कुस्ती आखाड्याचे उद्घाटन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here