माळशिरस ( बारामती झटका )
मनुष्य जीवनामध्ये जीवन जगत असताना राग, लोभ, द्वेष आणि अहंकार सोडून समाधानी आयुष्य जगण्याची गरज आहे. भगवंत सत्तेपुढे मानवी आयुष्य खूप शिल्लक आहे. त्या सत्यापुढे हरिचंद्र राजा व पांडव हे देखील हतबल झाले. त्यामुळे आपणही आयुष्यात भगवंत सत्ता मान्य करून सुखी, समाधानी व आनंदी आयुष्य जगले पाहिजे. वैर, अहंकार, बदला घेण्याची भावना, द्वेष, निंदा सोडून दिली पाहिजे, असे मौलिक विचार ह.भ.प. अमोल महाराज सुळ सर मोरोची यांनी माळशिरसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय शिवाजीराव काळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या किर्तनरुपी सेवेत उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माळशिरसचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच स्वर्गीय शिवाजीराव निवृत्ती काळे उर्फ आप्पा यांचे प्रथम पुण्यस्मरण गुरुवार दि. 7 ऑक्टोंबर 2021 रोजी माळशिरस, तिरवंडी रोड येथील निवासस्थानी संपन्न झाला.
प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त माळशिरस तालुक्यातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, उद्योग, व्यवसाय, मित्रपरिवार, नातेवाईक मंडळी उपस्थित होते.
ह.भ.प. अमोल महाराज सुळ यांनी प्रस्तुत सेवेकरिता “आले देवाच्या मना ! तेथे कोणाचे चालेना” या अभंगावर सुश्राव्य व सर्वसमावेशक असे दोन तास कीर्तन केले. उपस्थित सर्व लोकांना आयुष्यामध्ये जीवन जगत असताना कशाप्रकारे जगलं पाहिजे. आपल्या जगण्याचा इतरांना कसा फायदा झाला पाहिजे याची अनेक उदाहरणे देऊन उपस्थित लोकांना मंत्रमुग्ध केले होते. बारा वाजता कीर्तनाची सेवा समाप्त करून निर्वाणीचे अभंग “वाढ वेळ झाला उभा पांडुरंग ! वैकुंठाशी श्रीरंग बोलवितो” हा अभंग झाल्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली.

प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम रामदास शिवाजी काळे, सौ. वैशाली रामदास काळे, सतीश शिवाजी काळे, सौ. हर्षदा सतीश काळे व समस्त काळे परिवार यांनी कोरोनाचे नियम पाळून कीर्तनकार, टाळकरी, विणेकरी यांना भव्य व्यासपीठ, आलेल्या लोकांना बसण्यासाठी मंडप व्यवस्था केलेली होती. पुष्पवृष्टी आणि आरती झाल्यानंतर उपस्थितांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng