राजकीय हेतूने व्यक्तिगत स्वार्थासाठी अधिकाऱ्यांवर आरोप करणे चुकीचे – महादेव गायकवाड.

माळशिरस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी के. व्ही. खरात यांच्या सहकार्य व मदतीमुळे मांडवे गावाचा विकास होऊन अनेक पुरस्कार मिळाले

मांडवे ( बारामती झटका )

माळशिरस पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी के. व्ही. खरात यांच्या अथक परिश्रम, सहकार्य व मदतीमुळे मांडवे गावाचा विकास होऊन अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकीय हेतूने अधिकाऱ्यांवर आरोप करून चिखलफेक करणे चुकीचे असल्याचे मत माळशिरस तालुका आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष महादेव गायकवाड यांनी सांगितले. पुढे ते असेही म्हणाले की, असंतुष्ट विरोधी लोकांनी जनहितासाठी कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर आरोप करून बदलीची मागणी करणे यामागे व्यक्तिगत स्वार्थ आहे. हि समाजहिताची गोष्ट नसल्याचे महादेवराव गायकवाड यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांच्याकडे केलेल्या तक्रारीवरून माहिती सांगितली.

मांडवे गावाला बी. ए. भोसले ग्रामविकास अधिकारी आहेत, तर विस्ताराधिकारी के. व्ही. खरात आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांनी गावामध्ये काम करीत असताना कधीही कोणत्याही माणसाला दुजाभाव केलेला नाही. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्न केलेले आहेत. दोघांनी मांडवे गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानचा पुणे विभागात तिसरा क्रमांक मिळवून दिलेला आहे, स्मार्ट व्हिलेज सुंदर गाव हा पुरस्कार सोलापूर जिल्ह्यात पहिला मिळालेला आहे. स्वच्छ भारत मिशन राज्यात पहिला क्रमांक आलेला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाबरोबर युवकांसाठी खेळासाठी मैदान, जिम उभा केलेली आहे. पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी 50,000 वृक्ष लागवड करून महाराष्ट्रात पहिल्यांदा बिहार पॅटर्न राबविणारे मांडवे हे गाव आहे. ग्रामदैवत मारुती मंदिर तीर्थक्षेत्र विकास क वर्गात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. गावामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनसाठी वेळोवेळी लोकांना मार्गदर्शन व सहकार्य केलेले आहे. कचरा कुंड्यांची वर्गवारी करून ओला कचरा व सुका कचरा, घनकचरा या विषयी माहिती देऊन समाजामध्ये जनजागृती केलेली आहे. ग्राम विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी समाज हितासाठी वेळोवेळी नागरिकांना व जनतेला सहकार्य केलेले आहे.

अशा कार्यकुशल अधिकाऱ्यांवर व्यक्तिगत स्वार्थासाठी चिखलफेक करणे चुकीचे आहे, असे स्पष्ट मत आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष महादेव गायकवाड यांनी स्पष्ट करून विरोधकांचा आरोप करण्याचा हेतू स्पष्ट केलेला आहे. गावामध्ये दहा वर्षांनी काठावर सत्तापरिवर्तन झालेले आहे. परिवर्तन विकास पॅनलची सत्ता आहे. सत्ताधारी लोकांच्या जवळचे बगलबच्चे यांना व्यक्तिगत लाभ देण्याचा खटाटोप सुरू आहे. पात्र लाभार्थी नसताना ग्रामपंचायतमध्ये अधिकाऱ्यांवर दबाव आणून ठराव करून घेतली जातात, कधीकधी ग्रामसेवक यांना विश्वासात न घेता ठराव केले जातात. त्यामध्ये अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची नावे पंचायत समितीकडे पाठवली जातात. पंचायत समितीमधून निकषांमध्ये बसत नसणाऱ्या लोकांची नावे परत पाठवल्यानंतर व्यक्तिगत स्वार्थासाठी आपापल्या लोकांकडे अधिकाऱ्यांवर चिखलफेक करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

ग्रामपंचायतीकडून घरकुलाची, गायगोठा, विहीर अशा अनेक व्यक्तिगत लाभामध्ये गरज असणारे लोक यादीमध्ये समाविष्ट केलेले नाहीत. जवळचे बगलबच्चे यांच्याच याद्या पंचायत समितीकडे पाठवले असून खरे लाभार्थी वंचित राहिलेले आहेत. तक्रारीमध्ये असंतुष्ट एका व्यक्तीचे नाव आहे, मात्र त्याला मदत करणारे अनेक असंतुष्ट व्यक्ती आहेत.

मांडवे हे गाव तालुक्यात, जिल्ह्यात व राज्यात अनेक पुरस्काराने परिचित असल्याने गावाला व्यक्तिगत बदनाम करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये लवकरच मोहीम उघडली जाईल. परिवर्तन विकास पॅनलची सत्ता मांडवे गावांमध्ये आल्यापासून सर्व कामकाजाची चौकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करून विरोधकांचा बुरखा लवकरच फाढला जाईल, असे परखड मत माळशिरस तालुका आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष महादेव गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleधैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धानोरे गावचे देवकते यांचा जागरण गोंधळ कार्यक्रम संपन्न.
Next articleमहाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते टायझर कपड्याच्या शोरूमचा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here