राज्यभरात दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई (बारामती झटका)

राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ झाल्याने आता दिव्यांगांना कर्ज वाटप पूर्ववत होईल, अशी ग्वाही देतानाच दिव्यांग बांधव कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, दिव्यांग विकास विभागाचे सचिव अभय महाजन, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर, महाव्यवस्थापक युवराज पवार आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, दिव्यांग बांधव हे समाजातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता, कलागुण असून त्याला वाव देण्यासाठी महामंडळामार्फत प्रयत्न झाले पाहिजेत. महामंडळाला ५०० कोटींचे भाग भांडवल देण्यात आले असून गेली काही वर्ष थांबलेले कर्जवाटप आता पुन्हा सुरू होईल. त्यामुळे दिव्यांग बांधव स्वत:चा व्यवसाय सुरू करु शकतील.

राज्यात २०११ च्या जनगणनेनुसार २९ लाख दिव्यांग आहेत. मात्र, सध्या दिव्यांगांची संख्या किती आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्थानिक स्वराज्य संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, सामाजिक उत्तरदायित्व निधी या माध्यमातून दिव्यांगांना मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत. दिव्यांगांकडून निर्मिती, उत्पादित केलेल्या साहित्यांना स्टॉल देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन, मुख्यमंत्र्यांनी केले.

दिव्यांगांच्या मागण्या विभागाने संवेदनशीलपणे समजून घ्याव्यात आणि त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. दिव्यांगांना उत्तम दर्जाच्या साहित्याचे वाटप झाले पाहिजे. साहित्याच्या गुणवत्तेची तडजोड करू नका, असे सांगतानाच दिव्यांग बंधू-भगिनी स्वतःचा व्यवसाय सुरू करतील अशा बॅटरीवर चालणाऱ्या सायकल, वाहन त्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleWhat’s the Distinction restaurant le lac between Technology And begin Sort?
Next articleअकलूज येथे कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १४७ व्या जयंतीचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here