भोंगा हा सामाजिक विषय, तर मग बेरोजगारी, महागाई हे दहशतवादाचे विषय आहेत का ? महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व प्रवक्ते रविकांत वरपे यांची टीका
पुणे (बारामती झटका)
राज ठाकरे हे विविध उदाहरणे देऊन पवार साहेबांना ब्राह्मणविरोधी आणि जातीयवादी ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. राज ठाकरे हे हिंदू जननायक नाहीत तर, हिंदू मुस्लिम एकतेचे खलनायक बनत आहेत. भोंगा हा विषय राज ठाकरे यांना सामाजिक विषय वाटतो, तर मग बेरोजगारी, महागाई हे विषय काय दहशतवादाचे विषय आहेत का ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर प्रसिद्धीपत्रकाद्वारे रविकांत वरपे यांनी राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
रविकांत वरपे पुढे म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली, असे विधान राज ठाकरे यांनी केले. मात्र, त्यांना हे माहित नसेल कि, १८७० मध्ये कुळवाडीभूषण नावाने छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा हा महात्मा फुले यांनी लिहिला व १८८० मध्ये रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीही महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली व शिवजन्मोत्सव सुरु केला. शरदचंद्रजी पवार साहेब शाहू, फुले, आंबेडकर यांच्याबद्दल म्हणतात की, या तिन्ही महापुरुषांच्या विचारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा आहे.
पवार साहेब ब्राह्मण विरोधी आहेत, असं राज ठाकरे सांगतात. पण त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ब्राह्मण विचारवंतांनी देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. अशा ब्राह्मण विचारवंतांबद्दल मला व राष्ट्रवादी काँग्रेसला नितांत आदर आहे. बहुजनांचा खोटा इतिहास सांगणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे आहोत. छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ यांची बदनामी करणारे लेखन करणाऱ्या जेम्स लेन कडून मुलाखतीचा बहाना करून खोटी उत्तरे वदवून घेण्याचे कारण काय ? महाराष्ट्रातील जनता अशांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
आज देशातील महागाई, बेरोजगारी याबद्दल राज ठाकरे एकही शब्द बोलत नाहीत. भोंगा हा सामाजिक विषय वाटू लागला आहे. या माध्यमातून जाती धर्मात तेढ निर्माण करणे, हाच राज ठाकरे यांचा उद्देश दिसत आहे. त्यामुळे शरदचंद्रजी पवार साहेबांना जाती धर्मावरून बोलणे हा राज ठाकरे यांचा केवळ समाजात द्वेष पसरवणे हा उद्देश दिसतो. मात्र, समाजात जाती धर्मावरून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. रविकांत वरपे पुढे म्हणाले की, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद गेले आणि पवार साहेबांमुळेच भाऊ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत, हे पहावेना झाले आहे. म्हणून सध्या देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे पवार साहेबांवर ब्राह्मणविरोधी, जातीयवादी नेते म्हणून टीका करीत फिरत आहेत. पण आपल्या ५५ वर्षांच्या राजकारणात पवार साहेबांनी विकासाचे धोरणात्मक निर्णय घेतले हे सर्वांना माहीत आहे.
महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळत असताना भरकटलेले राज ठाकरे जात व धर्माभोवतीच गोल-गोल फिरत आहेत. भोंगा, हिंदू, मुस्लीम, ब्राह्मण हेच विषय राज ठाकरे यांना सामाजिक वाटत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. मराठी युवकांच्या बेरोजगारासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवेत मात्र, तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या समोर जे गुडघे टेकले आहेत ते मराठी युवकांना आवडलेले नाही, असेही रविकांत वरपे यांनी म्हटले आहे.
मनसेचे ‘महाराष्ट्र मनोरंजन सेना’ असे नामकरण करावेसे वाटते. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्याऐवजी पक्षाला धार्मिक द्वेषाकडे घेऊन जाण्याचे ठरवले आहे. त्यांना महाराष्ट्राचे राजकारण समजलेले नाही, असेही वरपे यांनी सांगितले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng