लग्नानंतर चार महिन्यातच विवाहितेचा खून, मुलीच्या मृतदेहावर माहेरच्यांनी करमाळा येथे घरी आणून केले अंत्यसंस्कार !!

माळशिरस तालुक्यातील नवरा, सासू-सासरे अटकेत

आरोपींना फाशी देण्याची आईची मागणी…

करमाळा (बारामती झटका)

करमाळा येथील कोमल सुभाष यादव हिचा चार महिन्यापूर्वी नेवरे, ता. माळशिरस येथील गणेश पांडुरंग गायकवाड याच्याशी थाटामाटात दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी विवाह नेवरे येथे झाला होता. नंतर चारच महिन्यात तिचे सासू-सासरा व नवऱ्याने निर्घुण खून केल्याची घटना घडली आहे.

मयत कोमलची आई राणी सुभाष यादव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लग्नानंतर कोमल गणेश गायकवाड या नवविवाहितेला सासू मनीषा व सासरा पांडुरंग गायकवाड व नवरा गणेश तिघे मिळून मानसिक त्रास देत होते. तुला चुलीवरचा स्वयंपाक येत नाही, तु लवकर उठत नाही, असे सांगून त्रास देत होते. तुझ्यापेक्षा मला सुंदर मुलगी मिळाली असती, अजूनही मला चांगले चांगले स्थळ येत आहेत, असे म्हणत नवरा गणेश मानसिक व शारीरिक त्रास देत होता. माहेरच्या लोकांना फोन करू देत नव्हता. पंधरा हजार रुपये माहेरुन आणून दे, म्हणून दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी कोमलला सासू सासरा व नवरा गणेश यांनी बेदम मारहाण करून तिच्या बरगड्या तोडून नरडे दाबून तिचा खून केला. व खून उघडकीला येऊ नये म्हणून. तिने फास घेतला असा बनाव केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी कोमलच्या माहेरकडील यादव कुटुंबांना आपली मुलगी सिरीयस आहे न्यायला या, असे म्हणून फोन केला. यावेळी यादव कुटुंबातले सदस्य अकलूज येथे गेले असता तिचे मयत होऊन पोस्टमार्टम सुरू असल्याचे सांगण्यात आले. पोलिसात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत होती. यावेळी कोमलच्या माहेरकडील लोकांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर मुहूर्त देत ताब्यात घेऊ, अशी भूमिका घेतली. यावेळी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोमलच्या माहेरकडील लोकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

यावेळी संतप्त झालेल्या यादव कुटुंबाने मृतदेह आम्ही आमच्या घरी जाऊन तिच्यावर अंत्यसंस्कार करणार, असे स्पष्ट बजावून मृतदेह करमाळा येथे आणून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लग्नानंतर केवळ चार महिन्यात कोमलचा निर्घुण खून सासू-सासरे व नवरा यांनी केला असून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मयत विवाहितेची आई राणी सुभाष यादव यांनी केली आहे.

कोमल यादव हीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून अत्यंत गरीब कुटुंबातील ही मुलगी असून नेवरे भागातील चांगला बागायतदार शेतकरी नवरा मिळाला म्हणून संपूर्ण यादव कुटुंब खुश होते. पण चारच महिन्यात आपल्या पोटच्या गोळ्याचा मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ यादव कुटुंबावर आली आहे. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात नवरा गणेश पांडुरंग गायकवाड, सासू मनीषा पांडुरंग गायकवाड, सासरा पांडुरंग रामचंद्र गायकवाड यांच्यावर भादवी 302 /304/34/ 304 /बी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
खून करणे व मानसिक त्रास देणे व पुरावा नष्ट करणे गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या तीन आरोपींना तात्काळ अटक केली आहे. कोमलच्या दुर्दैवी घटनेनंतर मैत्रिणी व नातेवाईकांमध्ये कमालीचे दुःखाचे वातावरण पसरले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसम्मेद शिखरजी पर्यटन क्षेत्र रद्द करण्याची जैन समाजाची मागणी
Next articleखंडाळी-दत्तनगर ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील सरपंचपदी सुनिता सुरवसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here