लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना पालकमंत्र्यांसाठी इंदापुरात फायद्याची तर, सोलापूर जिल्ह्यात वादाची

सोलापूर (बारामती झटका)

इंदापूर व बारामती तालुक्यासाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या, उजनीतील पाणी अठरा गावांना देणाऱ्या लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याने आता पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे ज्या मतदार संघाचे आमदार आहेत, त्या इंदापूर भागात त्यांना राजकीय फायदा होईल, असा अंदाज असला तरी सोलापूर जिल्ह्यातील त्यांचे विरोधक मात्र आता उजनीचे पाणी नेण्यावरून वाद रंगविण्याची शक्यता आहे.

लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना व्हावी, अशी मागणी गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरु आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील बारामतीमधील आठ व इंदापूर तालुक्यातील दहा गावांसाठी ही योजना आहे. ही गावे आवर्षणग्रस्त म्हणून ओळखली जातात. या गावांना इंदापूर व बारामती तालुक्यातील अन्य भागांप्रमाणे नीरा डावा अथवा खडकवासला कालव्याचे पाणी मिळत नाही. त्यांच्यासाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना राबविण्याची तयारी करण्यात आली होती. या योजनेचा उजनीच्या प्रकल्प अहवालातही समावेश आहे. यापूर्वी ही योजना मंजूर झाल्यानंतर यास सोलापूर जिल्ह्यातून विरोध झाला होता.

उजनी धरणातील पाणी नेण्यास नेहमीच सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच राजकीय व शेतकरी संघटना विरोध करतात. दरम्यान पुणे शहर व परिसरातून जे सांडपाणी उजनी जलाशयात येते त्या बदल्यात काही पाणी आवर्षणग्रस्त भागातील शेतीला देण्याचा प्रस्ताव यापूर्वीही तयार करण्यात आला होता. मात्र त्यास सोलापूर जिल्ह्यातून विरोध झाला. आत्ताही ज्या भागात पाणी जाणार आहे तो भाग सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे यांचा आहे. यामुळे साहजिकच भरणे विरोधक सक्रीय होवून सोलापूर जिल्ह्यात आता आंदोलनाची भाषा सुरु करतील. याचाच एक भाग म्हणून शनिवारी कुर्डुवाडीत एक बैठक घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान लाकडी निंबोडी ही योजना अहवालात प्रस्तावित असून ती राबविण्यास उशीर झाला आहे. या योजनेमुळे जवळपास ७ हजार २५० हेक्टर शेती ओलीताखाली येणार आहे. १९९५ पासून प्रत्येक निवडणुकीत ही योजना चर्चेला येते. मात्र ही योजना कोणत्याही परिस्थितीत राबविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पालकमंत्री भरणे यांनी घेतला होता. तो आता अंमलात येईल असे दिसत आहे. यासाठी ३४८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या योजनेसाठी उजनी जलाशय काठावरील कुंभारगावाजवळून पाणी उचलून पोंधवडी लघुपाटबंधारे तलावात आणले जाणार असून तेथून ते पोंधवडी तलावातून आणून लामजेवाडीच्या खालील बाजूस सोडले जाणार आहे. यासाठी दीड हजार मिलीमीटर व्यासाच्या पाईपलाईनचा वापर केला जाईल. येथून हे पाणी इंदापूरच्या दहा तर बारामती तालुक्यातील सात गावांपर्यंत बंद नलिकेमार्फत पोहोचविले जाणार आहे.

राजकीयदृष्ट्या मोठे महत्व

इंदापूर विधानसभा मतदार संघात २०१४ मध्ये दत्तात्रय भरणे हे पहिल्यांदा अपक्ष म्हणून तर २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर आमदार झाले. ते अजितदादा पवार समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांची लढत ही भाजपचे नेते तथा माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी होती. सलग दोन निवडणुकांमध्ये भरणे यांनी पाटील यांना पराभूत केले आहे. आता २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरु आहे. लाकडी निंबोडी योजना मंजूर झाल्याने इंदापूर व बारामती तालुक्यात राष्ट्रवादीला याचा फायदा होवू शकतो. अनेक वर्षांपासूनची जनतेची मागणी मान्य झाली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleतुकडेबंदीवर राज्य सरकार ठाम, औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करणार
Next articleझी टॉकीज फेम ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here