स्वेरीला ‘तेजोनिधी सेंटर फॉर सोशल डेव्हलपमेंट’ च्या आठ प्रभावी महिला सदस्यांची सदिच्छा भेट
पंढरपूर (बारामती झटका)
पंढरपुरच्या स्वेरी शिक्षण संस्थेकडे पाहिल्यास सध्याच्या शैक्षणिक विश्वात विशेषतः महाराष्ट्र राज्यात अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा आणखी सुधारत असल्याचे चित्र दिसून येते. ‘स्वेरी’चे नाव खूप ऐकून होते पण, आज प्रत्यक्षात येथील शिक्षण संस्कृती पहायला मिळाली. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या तंत्रशिक्षणाबरोबरच उत्तम संस्कार देखील करिअरच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे स्वेरीत मिळणारे शिक्षण विशेष महत्वाचे वाटते. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सध्या स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज हा सर्वोत्तम पर्याय आहे.’ असे गौरवोदगार तेजस्विनी ज्योतिर्मय यात्रेच्या संयोजिका व भाजपच्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनिल मेंढे यांच्या सुविद्य पत्नी सौ. शुभांगी मेंढे यांनी केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘अतुल्य भारत’ ही ‘आजादी का अमृत महोत्सव’ हे वर्ष साजरे करत असताना ‘तेजोनिधी सेंटर फॉर सोशल डेव्हलपमेंट’ च्या आठ प्रभावी महिलांनी भारत परिक्रमेचे आयोजन केले असून त्यांनी दि. १८ सप्टेंबर २०२१ ते दि. १२ ऑक्टोबर २०२१ या दरम्यान भारतातील जवळपास तेरा राज्यांना भेटी देऊन तेथील ‘संस्कृती आणि परंपरा’ याबद्दल अभ्यास केला. ही परिक्रमा पूर्ण करत असतानाच त्यांनी आज तंत्रशिक्षणात अग्रेसर असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला सदिच्छा भेट दिली. विशेष म्हणजे अकरा हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी आणि त्यांच्या महिला सदस्यांनी स्वतः ड्रायव्हिंग करत पुर्ण केला. प्रारंभी त्यांचे स्वागत स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे व संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी केले.
यावेळी ‘तेजोनिधी सेंटर फॉर सोशल डेव्हलपमेंट’ च्या सर्व सदस्यांनी स्वेरी कॅम्पसला भेट देवून सर्व माहिती जाणून घेतली. संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी महाविद्यालयाला मिळालेली मानांकने, संशोधन निधी याविषयी माहिती दिली. तसेच स्वेरी अंतर्गत असलेली चारही महाविद्यालये, त्यातील अभ्यासक्रम, वर्कशॉप, विविध विभाग, मुला-मुलींची वसतिगृहे, रात्र अभ्यासिका आणि इतर सोयी सुविधा प्रत्यक्ष पाहून पदाधिकारी व सदस्या भारावून गेल्या. यावेळी सोबत ‘तेजोनिधी सेंटर फॉर सोशल डेव्हलपमेंट’ च्या सदस्या सारीका मोहोत्रा, जया व्यास, वनिता शाह, मंजुषा जोशी, प्रिती चोले, प्रिती लेंडे व मिनल भोसले उपस्थित होत्या. यावेळी स्वेरी कॅम्पस इन्चार्ज, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. करण पाटील, इतर प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng