सरकार कोणतेही येवो, त्यांनी समाजाचे प्रश्न सोडवावेत – माजी खासदार छत्रपती संभाजीराजे
विश्रांतवाडी (बारामती झटका)
जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी एकत्र आला आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान झाले आहे तर अलंकापुरीतून श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे सुरू झाले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातील विश्रांतवाडी येथे आली आहे. माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी स्वराज्य संघटनेच्यावतीने युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या समवेत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश भैय्या डोंगरे हे उपस्थित आहेत.

यावेळी बोलताना माजी खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, कोरोना कालावधीनंतर तब्बल दोन वर्षांनी पालखी सोहळा सुरू झाल्याने सगळ्या वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे. मी सुद्धा या पालखीत पंधरा ते वीस किलोमीटर पायी चालणार आहे, त्यामुळे मी देखील खूप उत्साही आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना वंदन करण्यासाठी जवळपास वीस लाख भाविक कोणताही जातीभेद, भेदभाव न करता एकत्र येतात, या गोष्टीची दखल फक्त देशाने नव्हे तर जगाने देखील घ्यावी. मी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये हा विषय मांडला आहे. खासदारांनी देखील हा विषय मांडला पाहिजे.

यावेळी राजकीय घडामोडींविषयी विचारल्यावर त्यांनी सरकार कोणतेही येवो पण, त्यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनता, विद्यार्थी, शेतकरी, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे, समाजाचे प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
