वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित वेळापूर, ता. माळशिरस या सोसायटीची मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे. तीन खोल्यांमध्ये मतदान सुरु आहे. 398 पैकी 107, 400 पैकी 124, 400 पैकी 110 असे 341 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. एकूण 1198 मतदान आहे. दोन तासात 28 टक्के मतदान झाले आहे. सोसायटी निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे.
वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या एकूण 13 जागा आहेत. त्यापैकी श्री अर्धनारीनटेश्वर शेतकरी विकास पॅनल 13 जागा आणि परमपूज्य भाईनाथ महाराज परिवर्तन विकास पॅनल 12 जागा असे 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. श्री अर्धनारीनटेश्वर पॅनलच्या प्रतिष्ठेची लढाई तर परमपूज्य महाराज परिवर्तन विकास पॅनलच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. प्रचारामध्ये आरोप-प्रत्यारोप झालेले आहेत. आज प्रत्यक्ष मतदान सुरू आहे. सोसायटीचे सभासद वयोवृद्ध असल्याने वाहनांमधून मतदार आणले जात आहेत. शारीरिक व्यंग असणाऱ्या मतदारांचे नातेवाईक मतदान पोल करीत आहेत. दोन्ही पॅनलकडून जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयातील डी. पी. राऊत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस कर्मचारी मतदान प्रक्रिया करून घेत आहेत.

शांतता व सुव्यवस्था राखून निर्भयपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्याकरता अकलूज उपविभागीय कार्यालयाचे पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. मतदान चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. चार वाजल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng