वेळापूरचे माजी उपसरपंच पांडुरंग मंडले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

वेळापूरच्या शंभू महादेवाच्या नगर येथील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचा पांडुरंग हरपला.

वेळापूर ( बारामती झटका )

वेळापूर गावचे माजी उपसरपंच पांडुरंगआण्णा मंडले यांचे बुधवार दि. 29 सप्टेंबर 2021 रोजी सायं. ६ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
पांडुरंग मंडले यांना मंडलेआण्णा या टोपण नावाने ओळखत होते. वेळापूर ग्रामपंचायत निवडणूक वार्ड क्रमांक ५ मधून सलग सहा वेळा निवडून आलेले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय लोकनेते सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्यासोबत गावचे राजकारण केलेले आहे. वेळापूर ग्रामपंचायतमध्ये माजी सरपंच माणिकअण्णा चव्हाण यांना पहिल्यांदा सत्ताधार्‍यांच्या विरोधात सरपंच पदाची संधी आण्णांमुळे मिळालेली होती. त्यानंतर उत्तमराव जानकर व सौ. विमलताई जानकर यांनाही सरपंच करण्यामध्ये आण्णांचा सिंहाचा वाटा होता. वार्ड क्रमांक ५ आण्णांचा बालेकिल्ला झालेला होता. त्या वार्डातील इतर सदस्य आण्णांमुळे निवडून येत असत. वेळापूर ग्रामपंचायतमध्ये सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून आण्णांकडे पाहिले जात असत‌ वेळापूरमधील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या अडचणीसाठी नेहमी आण्णा प्रयत्न करीत असत. सर्व जाती धर्मात आण्णांच्या शब्दाला किंमत होती. आण्णांची वागणूक ही सर्व जाती धर्मात मिळून मिसळून होती, त्यामुळे आण्णांच्या दुःखद निधनाने सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचा पांडुरंग हरपलेला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी जीवनावश्यक किट वाटप, धान्य वाटप, अन्नछत्र अशा कार्यक्रमांमध्ये सातत्याने सहभाग होता. आण्णांचे वय झालेले होते, तरीसुद्धा त्यांचा जनतेसाठी काम करण्याचा उत्साह तरुणांना लाजवेल असा होता. त्यावेळेला आण्णांना कोरोना संसर्गरोगाची लागण झालेली होती. वयाच्या नव्वदाव्या वर्षी आण्णांनी कोरोनावर यशस्वी मात केलेली होती‌. नंतरच्या कालावधीमध्ये आण्णांना पाठीचा त्रास सुरू झालेला होता. एक वर्षापासून अण्णांचा त्रास वाढलेला होता. दवाखान्यात उपचार सुरू होते. राहत्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आण्णांवर अंत्यसंस्कार महादेवाच्या मंदिरा पाठीमागील स्मशानभूमीत करण्याचे ठरवलेले होते. रक्षाविसर्जन तिसर्‍याचा कार्यक्रम शुक्रवार दि. 1 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी सात वाजता होणार आहे. आण्णांच्या मृत आत्म्यास शांती लाभो व मंडले परिवार यांना दुःखातून सावरण्याची ईश्वर बळ देवो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुका बार असोसिएशनच्या सहसचिवपदी ॲड. आकाश पाटील यांची बिनविरोध निवड.
Next articleपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here